Donald Trump Kim Jong Un summit: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातील ऐतिहासिक बैठक सिंगापूरमध्ये पार पडली आहे. किम जोंग उनने इथपर्यंत पोहोचणं आमच्यासाठी सोप्पं नव्हतं, आम्ही अनेक अडथळे पार करुन इथपर्यंत पोहोचलो असल्याचं यावेळी म्हटलं. बैठकीबाबत विचारलं असता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला खूप चांगलं वाटत असून, आमची चर्चा आणि नातं चांगलं होणार असल्याचं सांगितलं. दोघांनीही ऐतिहासिक शिखर परिषदेनंतर संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या.

डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग यांना भेटल्याचा आनंद व्यक्त केला, तर दुसरीकडे किम जोंग या भेटीचं कौतुक करत भूतकाळ विसरण्याचं आश्वासन दिलं. दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या असल्या तरी नेमक्या कोणत्या गोष्टींवर त्यांची सहमती झाली आहे याचा खुलासा त्यांनी केला नाही.

किम जोंग यांनी यावेळी जग एक खूप मोठा बदल पाहिल असं आश्वासन यावेळी दिलं. आम्ही आमचा भूतकाळ मागे ठेवण्याचा निर्णय घेतला असून, जगाला खूप मोठा बदल पहायला मिळेल असं किम जोंग यांनी म्हटलं आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना किम जोंग यांना व्हाइट हाऊसचं निमंत्रण देणार का असं विचारलं असता त्यांनी नक्कीच असं उत्तर दिलं. भविष्यात पुन्हा भेट होणार का अशी विचारणा केली असता डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही पुन्हा भेटू, अनेकदा भेटू असं सांगितलं.

चर्चा संपल्यानंर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी त्यांनी आम्हाला सन्माजनक वाटत असल्याचं सांगितलं. मात्र त्यांनी बैठकीसंबंधी सविस्तर माहिती देण्यावर मौन बाळगलं.

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्या भेटीकडे संपुर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. ज्याप्रकारे दोन्ही नेते एकमेकांना भेटले ते पाहता यांच्यात एकेकाळी टोकाचे वाद होते असं वाटत नव्हतं. एक वेळ अशी होती, जेव्हा दोन्ही नेते एकमेकांवर अत्यंत खालच्या थराला जाऊन टीका करत होते. टीका करताना अनेकदा त्यांनी एकमेकांच्या खासगी गोष्टींवरही भाष्य केलं होतं. बैठकीनंतर मात्र दोन्ही नेत्यांनी एकमेकांबद्दल चांगली प्रतिक्रिया दिली आहे.