डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले. मात्र विद्यमान अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे व्हाइट हाऊस सोडण्यास तयार असल्याचे चित्र दिसत नाही. एका अहवालानुसार ट्रम्प यांचा व्हाइट हाऊसमधील वास्तव्याचा शेवटचा एक महिना राहिला आहे. बायडेन हे २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये ट्रम्प यांना व्हाइट हाऊस सोडावं लागणार आहे. मात्र व्हाइट हाऊस सोडण्याआधी ट्रम्प चीनविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारी असल्याचे समजते. ट्रम्प हे पुढील अध्यक्ष असणाऱ्या बायडेन यांना अडचणीत टाकणारा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प करोनाचा जगभर प्रादुर्भाव होण्यासाठी चीनला जबाबदार ठरवत आहेत. बीजिंगने केलेल्या चुकीचा अमेरिकेला मोठा आर्थिक फटका बसल्याचे मत ट्रम्प यांनी अनेकदा उघडपणे व्यक्त केलं आहे. जॉर्जटाउन विद्यापिठाचे वरिष्ठ फेलो असणारे जेम्स ग्रीन यांनी दिलेल्या माहितीनुसार २० जानेवारी रोजी बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परराष्ट्र धोरणांमध्ये अनेक मोठे बदल दिसून येतील. ट्रम्प हे एवढ्या सहजपणे आपल्या हातातील कारभार बायडेन यांच्याकडे सोपवणार नाही. बायडेन हे इराण आणि चीनबद्दलही मवाळ भूमिका घेतील अशी चिंताही ट्रम्प यांना आहे. त्याचप्रमाणे सौदीचे राजे बिन सलमान, तुर्कीचे राष्ट्राध्यश्र रेचेप तैयम एर्दोगन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांच्याविरोधात अमेरिका भूमिका घेऊ शकते.

आणखी वाचा- बायडेन यांच्या विजयामुळे पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव; शुभेच्छा देताना इम्रान यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार करोना आणि शिनजियांगमधील उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचे कारण देत ट्रम्प सत्तेमधील शेवटच्या काही दिवसांमध्ये असा निर्णय घेऊ शकतात ज्यामुळे चीन आणि अमेरिकेमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. यामध्ये चीनमधील कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित लोकांच्या व्हिजावर प्रतिबंध आणणे आणि अमेरिकन खेळाडूंनी बीजिंगमधील ऑलिम्पिक २०२२ मध्ये खेळू नये असे आदेश काढण्यासारख्या गोष्टींचा समावेश असू शकतो. याचबरोबरच चीनमधील हत्यारे तयार करणाऱ्या कंपन्यांना ट्रम्प अडचणीत आणू शकतात. या कंपन्यांकडून हत्यारांची खरेदी-विक्री करण्यासंदर्भातील व्यवहार रद्द करण्याबद्दलचे निर्णय घेऊ शकतात. जाणकारांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांनी असे काही निर्णय घेतल्यास सत्तेत येणाऱ्या ट्रम्प यांना संतापलेल्या चीनचा सामना करावा लागेल. मात्र याबद्दल बायडेन यांनी मवाळ भूमिका घेतल्यास बायडेन यांच्याबद्दल अमेरिकेतील जतनेमध्ये नकारात्मक संदेश जाऊ शकतो.

आणखी वाचा- पराभव आता मान्य करा, डोनाल्ड ट्रम्प यांना पत्नीचा सल्ला

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार ट्रम्प आणि बायडेन यांच्या चीनसंदर्भातील धोरणांमध्ये विशेष फरक नसेल. चीनविरोधी भूमिकेचा मुद्दा बनवून ट्रम्प यांना अनेक ठिकाणी आपला प्रचार केला आणि त्याचा त्यांना काही प्रमाणात फायदाही झाला. तर दुसरीकडे बायडेनही आपल्या सभांमधील भाषणांमध्ये चीनविरोधात कठोर शब्दांचा वापर करुन आपण चीनसंदर्भात मवाळ भूमिका घेणार नसल्याचे अधोरेखित करत होते. अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांकडे कायमच उइगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्यांचारांचा मुद्दा मांडत आहे. आता याच मुद्द्यावरुन ट्रम्प चीनविरोधात जाता जाता मोठं पाऊल उचलून बायडेन यांना अडचणीत आणू शकतात.