अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरीत नागरिकांविरोधातील आपली भूमिका अधिक कठोर केली आहे. अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तसेच अमेरिकेचे नागरिक नसलेल्यांच्या मुलांना जन्मानंतर मिळणाऱ्या घटनात्मक नागरिकत्वाच्या अधिकारावर लवकरच गदा येऊ शकते. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार अमेरिकेचे नागरिक नसलेल्यांच्या किंवा बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांच्या मुलांचा जन्म अमेरिकेत झाल्यास या मुलांना जन्मत: अमेरिकन नागरिकत्व मिळते.
ट्रम्प यांना हा नागरिकत्वाचा हा अधिकार संपुष्टात आणायचा आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली. फक्त एका अध्यादेशावर स्वाक्षरी केल्यास बर्थराइट किंवा जन्मसिद्ध अधिकाराची ही तरतूद रद्द होऊ शकते असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. ही तरतूद रद्द करण्यासाठी घटनात्मक दुरुस्तीची गरज नाही असे ते म्हणाले. ही तरतूद रद्द करण्यासाठी घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल असे मला आधी सांगण्यात येत होते. पण अशी कुठलीही गरज नाही असे त्यांनी सांगितले.
स्थलांतरितांच्या मुद्द्यावर भर दिल्यास आपल्या समर्थकांना प्रेरणा मिळते तसेच सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहात रिपब्लिकन्सना राजकीय लाभ होतो असे ट्रम्प म्हणाले. अमेरिका असा जगातील एकमेव देश आहे, जिथे एखादी व्यक्ती आल्यानंतर त्याला मूल झाले तर त्या मुलाला देशाच्या नागरिकत्वाबरोबरच सर्व लाभ मिळतात असे ट्रम्प म्हणाले. हा एक मूर्खपणा असून तो संपवण्याची गरज आहे असे ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची कमान संभाळल्यापासून त्यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण अवलंबले आहे. व्यापारापासून ते व्यवसायापर्यंत फक्त अमेरिकन नागरिकांनाच पहिले प्राधान्य मिळाले पाहिजे अशी त्यांची राजकीय भूमिका आहे. त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली आहे. अमेरिकेच्या हिताचा दाखला देत त्यांनी आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेले महत्वाचे जागतिक करारही मोडीत काढले आहेत.
व्हाइट हाऊसचे वकिल या संदर्भात काम करत आहेत, लवकरच एक अध्यादेश निघेल आणि अमेरिकन नसलेल्यांच्या मुलांना मिळणारं अमेरिकेचं नागरिकत्व मिळणं बंद होईल असे त्यांनी सांगितले. अमेरिकी घटनेच्या 14व्या घटनादुरूस्तीनुसार, अमेरिकेमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाला अमेरिकेच्या व त्या राज्याच्या कक्षेत असलेले सगळे अमेरिकेच्या नागरिकाचे अधिकार मिळतील. आता, डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भूमिका खरोखर अमलात आणली तर अक्षरश: लाखोजणांवर याचा परिणाम होऊ शकतो.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 6:48 pm