विविध धर्म व श्रद्धांच्या हजारो लोकांनी सोमवारी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे एकत्र जमून मुस्लीम समुदायाबाबत सहवेदना दाखवली. ट्रम्प यांनी मुस्लीम प्रवेश बंदीचा स्थलांतरविषयक आदेश जारी केल्याने येथे जमलेल्या सर्वानी ‘आय अ‍ॅम मुस्लीम टू’ असे फलक हाती घेतले होते. हा मेळावा ‘फाऊंडेशन फॉर एथनिक अंडरस्टॅण्डिंग’ व ‘नुसानतारा फाऊंडेशन’ यांनी आयोजित केला  होता.

ट्रम्प यांच्या आदेशाने मुस्लिमांमध्ये नैराश्याचे वातावरण असून सात मुस्लीम देशांतून येणाऱ्या लोकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मुस्लीम सहानुभूती मेळाव्यात हजारो लोकांनी ‘आय अ‍ॅम मुस्लीम टू’ अशा घोषणा दिल्या. त्यांनी ‘लव्ह ट्रम्पस हेट’, ‘यूएसए यूएसए’ व ‘नो मुस्लीम बॅन’ असे लिहिलेले फलक आणले होते.

[jwplayer HG1ADA5K]

अमेरिकन उद्योजक व लेखक रसेल सिमॉन्स तसेच अभिनेत्री सुसान सारँडॉन यांनी काल या मेळाव्यात हजेरी लावली. अमेरिकेतील विभाजनवादी राजकीय वातावरणाचा त्यांनी निषेध केला. मुस्लिमांसाठी अमेरिकी लोकांनी त्यांच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासियो यांनी सांगितले की, अमेरिकेची स्थापना सर्व जाती, धर्म, पंथ व श्रद्धा यांना सारखा सन्मान देण्याच्या तत्त्वावर झाली आहे. त्यामुळे कोण कुठे जन्मला, त्याची पाश्र्वभूमी काय आहे, त्याचा धर्म व श्रद्धा काय आहेत याचा विचार न करता त्यांना हा देश, हे शहर आपले आहे असे वाटावे याचा संदेश गेला पाहिजे.  न्यूयॉर्कच्या पोलीस दलात असलेल्या ९०० मुस्लिमांची प्रशंसा करताना त्यांनी सांगितले की, जगातील १.६ अब्ज मुस्लीम हे शांतताप्रेमी आहेत. शीख अमेरिकन कार्यकर्त्यां सिमरनजीत सिंग यांनी सांगितले की, शीख म्हणून आम्हाला भेदभाव सहन करावा लागला असून त्यामुळे आम्ही या मेळाव्यात सहभागी आहोत. सारँडॉन यांनी सांगितले की, जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्ही आत्मसंतुष्ट राहाल. आपले हक्क हिरावून घेताना राज्यघटनेची मोडतोड करणारी यंत्रणा यशस्वी होऊ नये म्हणून आपण येथे जमलो आहोत.

[jwplayer 1zLrQ1sm]