सात प्रतिबंधित मुस्लीम देशातील ग्रीनकार्डधारकांना सूट मिळणार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतर बंदीचा नवा आदेश जारी करण्याचे ठरवले असून त्यातील मसुद्यात आधीच्या मूळ आदेशातील देशांतील लोकांवर अमेरिकेत येण्यास बंदी कायम ठेवली असून ज्यांच्याकडे आधीच व्हिसा आहे त्यांना अमेरिकेत येण्यास मुभा दिली आहे. जरी त्यांनी तो व्हिसा अजून वापरला नसेल तरी त्यांना अमेरिकेत येण्यास सूट असेल.

संघराज्य न्यायालयाने आधीच्या मुस्लिमांशी निगडित स्थलांतराचा आदेश फेटाळला होता. त्या आदेशात सात देशातील मुस्लिमांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती.

आता नवीन आदेशातही या सात देशांची नावे कायम आहेत. त्यात इराण, इराक,सीरिया, येमेन, सोमालिया, सुदान व लीबिया यांचा समावेश आहे. जे ग्रीनकार्डधारक आहेत व ज्यांच्याकडे अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे ते नागरिक या देशांमधील असले तरी त्यांना अमेरिकेत येण्याजाण्यास सूट देण्यात येत आहे. सीरियन शरणार्थीना एकटे पाडून नवीन व्हिसा अर्जात नाकारले जाऊ नये असेही या आदेशात म्हटले आहे.

सुधारित आदेशाबाबत व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या सारा हकाबी यांनी सांगितले की, या प्रस्तावाचा मसुदा सध्या प्रसारित करण्यात आला असून त्यावर मते घेतल्यानंतर त्याला अंतिम रूप दिले जाईल. अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने मात्र यात कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. द वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे की, सुधारित आदेशाच्या मसुद्यात सात देशांची सुटका केलेली नाही, फक्त त्या देशाच्या ज्या लोकांकडे ग्रीनकार्ड आहे त्यांना सूट देण्यात आली आहे.

ट्रम्प यांच्या मूळ आदेशाने खळबळ उडाली होती व जगातून त्यांच्यावर टीका झाली होती. सात प्रतिबंधित देशांच्या अनेक नागरिकांची विमानतळावर धरपकड करण्यात आली होती. त्यातील ग्रीनकार्ड धारकांना त्या वेळी अमेरिकेतील वकिलांनी कायदेशीर साहाय्यही केले होते. अमेरिकेतील विमानतळांवर या आदेशाविरोधात निदर्शने झाली होती. मूळ आदेशात सात मुस्लीम देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्याजाण्यास बंदी घालण्यात आली होती.