अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याआधी त्यांचे खास हेलिकॉप्टर ‘मरीन-वन’ गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले आहे. गुरुवारी हे हेलिकॉप्टर अहमदाबाद विमानतळावर पोहोचले. डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. सोमवारी अहमदाबादमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एका रोड शो मध्ये सहभागी होतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर नव्याने बांधलेल्या क्रिकेट स्टेडियममधून दोन्ही नेते एका विशेष कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या खासगी हेलिकॉप्टरआधी हरक्युलिस ‘ग्लोब मास्टर’ विमान अहमदाबाद विमानतळावर दाखल झाले. या विमानामधून डोनाल्ड ट्रम्प यांची खास गाडी, फायर सेफ्टी सिस्टिम, स्पाय कॅमेरा आणि मरीन कमांडोसच्या वस्तू पोहोचल्या आहेत.

कसं आहे मरीन वन
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मरीन वन हेलिकॉप्टरमध्ये अनेक वैशिष्टय आहेत. हे हेलिकॉप्टर क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेने सुसज्ज आहे. मरीन वन हेलिकॉप्टर VH-3 कॅटेगरीचे असून ते पूर्णपणे सुरक्षित आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या परदेश दौऱ्यामध्ये हे हेलिकॉप्टर नेहमीच त्यांच्यासोबत असते. आपतकालीन सिस्थितीत बाहेर पडण्याचीही या हेलिकॉप्टरमध्ये खास व्यवस्था आहे.

ट्रम्प यांच्या ताफ्यातील ‘द बिस्ट’ ही राष्ट्राध्यक्षांची अधिकृत कार आहे. हत्येचा प्रयत्न किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सुरक्षित राहू शकतात अशी या लिमोझीन कारमध्ये व्यवस्था आहे.

एक सारखीच पाच मरीन वन
व्हाइट हाऊस आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे मरीन वन आकाशात असताना, त्याचवेळी आणखी तशीच पाच हेलिकॉप्टर उड्डाण करत असतात. दहशतवादी हल्ल्याच्या प्रयत्नात असतील तर, त्यांचा गोंधळ उडवण्याचा त्यामागे उद्देश असतो.

या हेलिकॉप्टरचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे हेलिकॉप्टर उड्डाणवस्थेत असताना, इंजिनचा जो आवाज होता तो आतमध्ये पोहोचत नाही. बाहेरचा आवाज आत येणार नाही अशा प्रकारे या हेलिकॉप्टरची रचना करण्यात आली आहे. एकाचवेळी १४ लोक या हेलिकॉप्टरमध्ये बसू शकतात. हे हेलिकॉप्टर प्रति तास १५० किलोमीटरच्या वेगाने उड्डाण करु शकते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump official helicopter marine one lands in ahmedabad dmp
First published on: 21-02-2020 at 20:09 IST