डोनाल्ड ट्रम्प यांचा सवाल

चालू आठवडय़ात मेक्सिको लगतच्या सीमेवरून अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या किती पाकिस्तानी स्थलांतरितांना अटक करण्यात आली, अशी विचारणा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या टेक्सास येथील सीमावर्ती भागाच्या दौऱ्यात केली आहे.

दक्षिण आशियातील अनेक लोक मेक्सिको लगतची सीमा ओलांडून येत आहेत असे त्यांना सांगण्यात आले असता, त्यांनी यात पाकिस्तानी लोक किती आहेत अशी विचारण केली. कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना दक्षिण सीमेवरील  दौऱ्यात स्थलांतरितांनी सीमा ओलांडण्याचे केलेले प्रयत्न त्यात अटक केलेल्यांची नावे, सुरक्षा स्थिती याची माहिती दिली. आतापर्यंत ४१ देशांच्या स्थलांतरितांना अटक करण्यात आली असून त्यात मध्य अमेरिका व मेक्सिको वगळता इतर देशांचे १४४ लोक असून त्यात भारतीय, पाकिस्तानी व रोमानियन लोकांचा समावेश आहे असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले.

त्यावर ट्रम्प यांनी या अटक केलेल्या लोकांमध्ये पाकिस्तानी किती आहेत अशी विचारणा केली. त्यावर दोन पाकिस्तानी लोकांना अटक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांना दिली. टेक्सासचे सिनेटर जॉन कॉर्नन यांनी सांगितले की, अनेक देशांचे लोक अमेरिका-मेक्सिको सीमेवर सुरक्षा नसल्याचा फायदा घेत आहेत. यावेळी सिनेटर टेड क्रूझ उपस्थित होते. ट्रम्प यांनी प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी अमेरिका-मेक्सिको सीमेच्या काही भागाला भेट दिली. या सीमेवरून हजारे बेकायदेशीर स्थलांतरित अमेरिकेत येत असून त्यात जास्त लोक हे मध्य आशियातील आहेत.