अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा फ्लोरिडातील सभेत प्रसारमाध्यमांवर सडकून टीका केली असून, आपण खोटय़ा बातम्यांचा अडथळा दूर सारून जनतेशी  बोलू इच्छितो, असे त्यांनी सांगितले. अप्रामाणिक प्रसारमाध्यमांचा पर्दाफाश केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे त्यांनी सत्तेवर आल्यानंतर महिना पुरा झाला नसताना म्हटले आहे. प्रसारमाध्यमेच अमेरिकी जनतेची खरी शत्रू आहेत असे वक्तव्य त्यांनी अलीकडेच केले होते. फ्लोरिडातील सभेत त्यांनी अध्यक्षीय प्रचारादरम्यानच्या शैलीत प्रसारमाध्यमांवर तोंडसुख घेतले. परवा झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रसारमाध्यमांवर फारच वाईट पद्धतीने व अपमानास्पद टीका केली होती.

अध्यक्षीय काळातील कामगिरीचे समर्थन करताना त्यांनी अमेरिकेत आशावादाचे नवे पर्व सुरू असल्याचा दावा केला. अस्वस्थ व निराश दिसत असलेल्या ट्रम्प यांनी पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांवर आगपाखड करताना सांगितले, की मी त्यांना खोटय़ा बातम्या पसरवू देणार नाही, ते तसे करणार नाहीत यासाठी आपण सर्व ते करू असे त्यांनी ९ हजार समर्थकांना सांगितले. माझ्या समर्थकांशी मी कुठलेही खोटय़ा बातम्यांसारखे  अडथळे न ठेवता थेट बोलणार आहे. प्रसारमाध्यमांचा स्वत:चा कार्यक्रम आहे, त्यांची काही उद्दिष्टे आहेत व त्यांचा अजेंडा म्हणजे कार्यक्रम हा आमचा अजेंडा नाही. माझ्या प्रशासनात सारे काही झकास चालले आहे, असा निर्वाळा देतानाच व्हाइट हाऊसमध्ये गोंधळ असल्याचा प्रसारमाध्यमांचा आरोप त्यांनी फेटाळला. ट्रम्प यांच्या २०२० फेरनिवड समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या वेळी ट्रम्प यांनी सांगितले, की अगदी कमी काळात आम्ही जे करून दाखवले ते तुम्ही पाहिले. व्हाइट हाऊसचे कामकाज सुरळीत चालले आहे.

आधीच्या राजवटीतून काही घोटाळे वारशाने मिळाले आहेत. प्रसारमाध्यमे सत्य सांगायला तयार नाहीत. ते भ्रष्ट बनले आहेत व त्यांच्यातच अनेक उणिवा आहेत. प्रसारमाध्यमांनी कितीही खोटय़ा बातम्या देऊन अपप्रचार केला असला तरी निवडणुकीत ते आम्हाला पराभूत करू शकले नाहीत, असेही ट्रम्प म्हणाले.

दोन दिवसांत सुरक्षा सल्लागाराची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी येत्या दोन दिवसांमध्ये नव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या नावाची घोषणा करणार असल्याचे सांगितले. यापूर्वीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लीन यांना रशियाशी संबंध असल्याच्या कारणावरून राजीनामा द्यावा लागल्याने नव्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची नियुक्ती करावी लागत आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते सीन स्पायसर यांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल कीथ केलॉग, संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेचे माजी राजदूत जॉन बोल्टन, लष्कराचे लेफ्टनंट जनरल एच. आर. मॅकमास्टर आणि वेस्ट पॉईंट येथील अमेरिकी लष्करी प्रशिक्षण संस्थेचे अधीक्षक लेफ्टनंट जनरल रॉबर्ट कॅस्लेन यांच्या नावांचा सध्या या पदासाठी विचार होत आहे.