दुबई आणि चीनमधील पायाभूत सुविधांची तुलना करता महासत्ता असलेली अमेरिका आता तिसऱ्या जगातील देश बनला आहे, असे रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. तथापि, आपण अमेरिकेचे अध्यक्ष झालो ही या परिस्थितीत बदल घडेल, असे आश्वासनही ट्रम्प यांनी दिले आहे.
लोकहोस आपण आता तिसऱ्या जगातील देश झालो आहोत, असे ट्रम्प यांनी उटाहमधील सॉल्ट लेक सिटी येथील निवडणूक सभेत स्पष्ट केले. तुम्ही दुबई किंवा चीनमध्ये गेलात तर तेथील रस्ते पाहा, रेल्वे मार्गाकडे पाहा, त्यांच्याकडे बुलेट ट्रेन असून त्या ताशी १०० कि.मी. वेगान धावतात आणि तुम्ही न्यूयॉर्कला गेलात तर तेथे १०० वर्षांपूर्वीची स्थिती असल्यासारखे दिसते, असेही ट्रम्प म्हणाले.
आपण अध्यक्ष झालो तर आयसिसचा समूळ नायनाट करू आणि देशाची नव्याने उभारणी करू, व्यापाराचा प्रश्न आल्यास आम्ही तत्परतेने सरसावतो कारण आपला देश गरीब आहे, आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवू, सध्या अमेरिका महान नाही आणि त्यासाठी आपल्याला शिक्षणाची गरज आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
ट्रान्स पॅसिफिक भागीदारी हा विनाशकारी व्यापार करार आहे, आपण अध्यक्ष झाल्यास अमेरिकेला अनुकूल असलेला करार केला जाईल, हा मुक्त व्यापाराचा प्रश्न नाही, मुक्त व्यापार उत्तम आहे, मात्र त्यासाठी आपल्याकडे तितक्याच प्रभावी व्यक्तींची गरज आहे, असेही ते म्हणाले.
आपला देश गरीब असल्याने आपण अमेरिकेत पुन्हा संपन्नता आणू, आपण विश्वास ठेवणार नाही इतकी सध्या तूट आहे, आपण सध्या बुडबुडय़ावर आहोत आणि तो धोकादायक बुडबुडा आहे, वेळीच पावले उचलली नाहीत तर हा अक्राळविक्राळ बुडबुडा एक दिवस फुटेल, त्यामुळे तुम्हाला योग्य व्यक्तींची गरज आहे, सध्या आपल्याकडे अयोग्य व्यक्ती आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
आपण अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यास स्थितीत झपाटय़ाने बदल होतील, असे आश्वासनही या वेळी त्यांनी दिले. फ्लोरिडा, इलिनॉइस आणि उत्तर कॅरोलिना या राज्यांमध्ये लक्षणीय विजय मिळविल्यानंतर सॉल्ट लेक सिटीतील ही त्यांची पहिलीच सभा होती.

निवेदिकेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
वॉशिंग्टन : रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिनीवरील निवेदिकेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले आहे.
‘मेगन केली शो’ या कार्यक्रमावर प्रत्येकाने बहिष्कार टाकला पाहिजे, असे ट्रम्प यांनी शुक्रवारी ट्वीट केले आहे. फॉक्स न्यूज या वाहिनीवरून ‘द केली शो’ हा कार्यक्रम मेगन केली या निवेदिका सादर करतात.
हा कार्यक्रम पाहण्यासारखा नाही, मेगन केली ही मानसिकदृष्टय़ा आजारी असून दूरचित्रवाणी वाहिनीसाठी त्यांची उपयुक्तता राहिलेली नाही, असे सांगून ट्रम्प यांनी अमेरिकेतील या पत्रकारासमवेत असलेले आपले वैर एका नव्या पातळीवर नेले आहे.
ट्रम्प यांनी सदर वक्तव्य केल्याने मेगन केली यांच्या समर्थनार्थ केवळ फॉक्स न्यूजच नव्हे, तर अन्य पत्रकारही सरसावले आहेत, मेगन ही अमेरिकेतील एक अग्रगण्य पत्रकार आहे, तिच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे आणि तिला आमचा पाठिंबा कायम आहे, असे वाहिनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.