अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करत प्रमुख सहकारी परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन यांना पदावरून हटवले आहे. टिलरसन यांच्या जागी सीआयएचे प्रमुख माईक पोम्पिओ यांना नियुक्त केले आहे. ट्रम्प यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

माईक पोम्पिओ हे आता आपल्या देशाचे नवे परराष्ट्र मंत्री असतील. ते खूप चांगलं काम करतील अशी मला आशा आहे. रेक्स टिलरसन तुम्ही दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद. जीना हास्पेल या आता सीआयएच्या नव्या संचालक असतील. सीआयएच्या प्रमुख असलेल्या त्या पहिल्या महिला आहेत.

फेब्रुवारी २०१७ मध्ये रेक्स यांनी पदभार घेतल्यापासून त्यांच्यात आणि ट्रम्प यांच्यात मतभेद सुरू झाले होते. व्हर्जिनिया येथील एका रॅलीत झालेल्या हिंसेवरून ट्रम्प यांच्या निराशाजनक प्रतिक्रिया देण्यावरून दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये अनेक कारणांवरून मतभेद निर्माण झाले होते.

दोघांमधील मतभेदाचे ताजे प्रकरण म्हणजे जेव्हा टिलरसन हे उत्तर कोरियाबरोबर अणू कार्यक्रमाबाबत कूटनीतिक उपाय शोधण्याचा प्रयत्न करत होते. ते सातत्याने उत्तर कोरियाच्या संपर्कात होते. टिलरसन यांच्या या धोरणावर ट्रम्प यांनी टीका केली होती. रेक्स आपली ऊर्जा नाहक खर्च करत असल्याचे ट्विट त्यांनी केले होते. त्यानंतर दोघातील संबंध आणखी ताणले गेले होते.