वॉशिंग्टन : डेन्मार्कचा स्वयंशासित असलेला ग्रीनलँड हा प्रदेश विकत घेण्याचा प्रस्ताव अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडला आहे. हा प्रदेश बर्फाच्छादित असून ट्रम्प यांनी त्यांच्या सल्लागारांना तो विकत घेण्याबाबत चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत. दी वॉल स्ट्रीट जर्नलने याबाबत माहिती दिली असून चर्चेत सहभागी व्यक्तींचा हवाला दिला आहे.

ग्रीनलँड हा नैसर्गिक साधनांनी परिपूर्ण प्रदेश असून त्याचे भूराजकीय महत्त्वही मोठे आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा स्वयंशासित भाग असून त्याचे क्षेत्रफळ ७७२००० चौरस मैल म्हणजे २० लाख चौरस किलोमीटर आहे. हे बेट १८ व्या शतकातील असून तेथे ५७ हजार लोक राहतात. ते तेथील मूळ इन्युट समुदायाचे आहेत. ग्रीनलँड बेट विकत घेण्याच्या ट्रम्प यांच्या प्रस्तावाबाबत व्हाइट हाऊसने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. डेन्मार्कच्या दूतावासानेही एएफपी या वृत्तसंस्थेने प्रतिक्रिया मागितली असता ती दिलेली नाही. ट्रम्प यांच्या सल्लागारांनी त्यांना असे सांगितले होते,की कॅनडाच्या ईशान्येला असलेले ग्रीनलँड बेट साधनसंपत्तीने परिपूर्ण असून ते अमेरिकेसाठी फायद्याचे आहे. काहींच्या मते अध्यक्ष ट्रम्प यांनी मांडलेली ती एक कल्पना आहे. व्हाइट हाऊस बाहेरील सूत्रांनी सांगितले,की ट्रम्प यांना तेथे कायदेशीर ताबा हवा असावा. अमेरिकेचा खुला हवाईतळ हा ग्रीनलँडमध्येच आहे. ग्रीनलँडमध्ये हिरवाई आहे अशातला भाग नाही, तेथील ८५ टक्के भाग हा १.९ मैल जाडीच्या (तीन किलोमीटर) बर्फाने आच्छादलेला आहे. त्या बर्फात जगातील १० टक्के पाणी आहे. जगातील सर्वात मोठे बेट असलेल्या ग्रीनलँडला हवामान बदलांचा फटका बसला असून वैज्ञानिकांच्या मते तेथील  बर्फ वितळत आहे. त्यामुळे जगातील किनारी भाग पाण्याखाली जातील. जुलैत ग्रीनलँडमधील बर्फ वितळले असून १२ अब्ज टन बर्फ सागरात आले आहे. ट्रम्प यांनी २०१७ मध्ये पॅरिस हवामान करारातून माघार घेतली होती. ते सप्टेंबरमध्ये कोपनहेगनला भेट देणार आहेत.

ट्रम्प यांनी परदेशातील मालमत्ता विकत घेण्यात स्वारस्य दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वी उत्तर कोरियातील बंदरे ताब्यात घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.