अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुचर्चित दौऱ्याला आज मूर्तस्वरूप आले. अमेरिकहून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्यांची पत्नी मलेनिया ट्रम्प आणि त्यांची कन्या इव्हान्का ट्रम्प सकाळी थेट गुजरातमध्ये दाखल झाले. भारतात दाखल झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. तिथे त्यांनी चरख्यावर सूतकताई केली. यानंतर ट्रम्प यांनी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा मैदानावरील कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी आपल्या भाषणात त्यांनी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांचे तोंडभरून कौतुक केले.

Video : स्मिथची ‘हवाई फिल्डिंग’! सीमारेषेवर षटकार जात असताना काय केलं पाहा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण झाल्यावर ट्रम्प यांच्या भाषणाला सुरूवात झाली. त्यांच्या भाषणात त्यांनी भारतातील महत्त्वाच्या आणि खास अशा गोष्टींवर प्रकाश टाकला. त्याचसोबत त्यांनी भारतात असलेलं बॉलिवूडचं जग आणि क्रिकेटबद्दलचं प्रेम याबाबतही सांगितलं. “संपूर्ण जगभरात बॉलिवूडचे चित्रपट मनापासून पसंत केले जातात. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, शोले या सारखे चित्रपट जगभरात चांगलेच गाजले. भांगडा हा नृत्यप्रकार देखील जगभरात लोकप्रिय आहे. महत्त्वाचे म्हणजे दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची नावं आली की जगभरात जल्लोष केला जातो” अशा शब्दात ट्रम्प यांनी त्यांचं कौतुक केले.

“अमेरिकेचे भारतावर प्रेम आहे. आम्ही तुमचा आदर करतो म्हणून फर्स्ट लेडी मलेनिया आणि मी आठ हजार मैलावरुन प्रवास करुन आलो आहोत. मोदी चॅम्पियन आहेत आणि ते माझे खरे मित्र आहेत. भारतीयांनी त्यांना प्रचंड मोठया मताधिक्क्याने निवडून दिले. यावरून हे दिसून येते की भारतीयांनी ठरवले, तर ते काहीही करु शकतात. भारतातील प्रत्येक गावात वीज पोहोचली आहे, जास्तीत जास्त लोक इंटरनेटशी जोडले गेले आहेत. LPG गॅस जास्तीत जास्त घरांमध्ये उपलब्ध झाला आहे. लोक दारिद्रयरेषेतून वर येत आहेत. त्यामुळे काही वर्षात गरीबीतून भारत मुक्त होईल आणि तुम्ही प्रचंड प्रगती करुन पुढे जाल”, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.

मॅच फिक्सिंग : ICC कडून क्रिकेटपटूवर ७ वर्षांची बंदी

“भारत एक मुक्त आणि स्वतंत्र समाज आहे. त्यामुळेच भारत आणि अमेरिकेमध्ये स्वाभाविक मैत्री आहे. अमेरिकन लष्कर आणि भारतीय लष्करामधील समन्वय युद्ध सरावाने मजबूत करण्यात येईल. भारताला ड्रोन विमानं देण्यात सहकार्य केले जाईल. जसं आम्ही अल बगदादीला संपवलं, तसंच आम्ही एकत्र येऊन दहशतवादाला रोखू. भारत आणि अमेरिका एकत्र येऊन दहशतवादाचा मुकाबला करु”, असेही तो ट्रम्प यांनी नमूद केले.