अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत २०२० मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले आहे. यासाठी प्रचारालाही त्यांनी मंगळवारपासून औपचारिकरित्या सुरुवात केली.


फ्लोरिडा प्रांतातील ओरलैंडोमध्ये त्यांनी सुमारे २० हजार लोकांना संबोधित केले. अमेरिका जगाच्या शिरपेचातील तुरा आहे. मात्र, देशाला तोडण्याची मोहिम चालवणारा पक्ष असा डेमोक्रॅटिक पक्षावर गंभीर आरोप करीत त्यांनी औपचारिकरित्या आपल्या प्रचारालाच सुरुवात केली.

यावेळी ट्रम्प म्हणाले, २०१६ मध्ये आम्ही हे करुन दाखवलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही इतिहास घडवणार आहोत. आमच्या या भुमिकेद्वारेच आम्ही विरोधीपक्षाला पूर्णतः धोबीपछाड देऊ. आपली अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक ताकदवान अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. गेल्या चार वर्षात आमच्या सरकारने देशांतर्गत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की देशाची जनता पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास दाखवेल.

या विश्वासाच्या जोरावरच आम्ही पुन्हा एकदा अमेरिकेला महान बनवण्याच्या दिशेने पुढे जात आहोत. अमेरिकेचे सध्याचे जे चित्र आहे त्यापेक्षा अधिक चांगले चित्र आम्ही तुमच्यापुढे ठेऊ असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित जनतेला दिला. दरम्यान, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपली आक्रमक भुमिका मांडत माध्यमांवर निशाणा साधला. ते म्हणाले, फेकन्युजमुळे देशाचे आणि अमेरिकी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.