अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ज्या कार्यकारी निर्णयांमुळे देशाची आर्थिक प्रगती आणि रोजगारनिर्मिती हे दोन्ही खुंटले, असे अनेक निर्णय सूत्रे हाती घेण्याच्या पहिल्याच दिवशी रद्द करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार असल्याची माहिती ट्रम्प यांच्या एका निकटवर्तीयाने दिली.

सध्याच्या राजवटीने गेल्या आठ वर्षांत केलेले नियम आणि घेतलेले निर्णय यामुळे आर्थिक प्रगती व रोजगारनिर्मितीत अडथळे आले, त्यांपैकी अनेक ट्रम्प तत्काळ रद्द करतील, असे ट्रम्प यांचे व्हाइट हाऊसमधील भावी माध्यम सचिव सीन स्पाइसर यांनी एबीसीच्या ‘धिस वीक’ कार्यक्रमात सांगितले.

२० जानेवारी रोजी पदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प ज्या दोन कृती तत्काळ करणार आहेत त्यापैकी ही एक असल्याचे स्पाइसर म्हणाले. मात्र ट्रम्प कुठले कार्यकारी निर्णय रद्द करतील हे त्यांनी स्पष्ट केले नाही. तथापि इमिग्रेशन, ऊर्जा नियमन आणि परराष्ट्र धोरण याबाबत ओबामा यांच्या धोरणांवर ट्रम्प दीर्घकाळापासून टीका करीत आलेले असून, हे तसेच इतर निर्णय निष्प्रभावी करण्याचे ते प्रयत्न करू शकतात.

धोरणविषयक महत्त्वाची निवेदने ट्विटरवर जाहीर करण्याचा आपला असाधारण आणि अत्यंत वादग्रस्त दृष्टिकोन ट्रम्प कायम ठेवतील काय असे विचारले असता, ‘नक्की. का नाही?’, असे स्पाइसर उत्तरले. या समाजमाध्यमावर त्यांचे अनुसरण करणाऱ्या साडेचार कोटींहून अधिक लोकांशी ते याद्वारे थेट संवाद साधू शकतात, असे त्यांनी नमूद केले.

धोरणात्मक निर्णय ट्रम्प ट्विटरवर जाहीर करणार

संगणक व इंटरनेटसारख्या इतर माध्यमांतून महत्त्वाचे संदेश पाठवणे धोकादायक असून त्यामुळे माहिती बाहेर फुटू शकते, असे मत नववर्षदिनी व्यक्त केल्यानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरचा वापर सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अध्यक्ष झाल्यानंतर ते अनेक मोठय़ा गोष्टी करणार आहेत, असे त्यांचे संज्ञापन संचालक सीन स्पायसर यांनी सांगितले. ट्रम्प सूत्रे हाती घेतल्यानंतर कोणती एक मोठी गोष्ट करणार आहेत असे विचारले असता ते म्हणाले की, ते एकच नव्हे तर अनेक मोठय़ा गोष्टी करणार आहेत. अध्यक्ष ट्रम्प हे सूत्रे हाती घेताच गेल्या आठ वर्षांत ओबामा प्रशासनाने आर्थिक वाढ व रोजगार वृद्धीत अडथळे आणणारे जे निर्णय घेतले ते रद्द करणार आहेत. सरकारी अधिकारी नंतर दबाव गटात सामील होतात पण आता त्यांना सरकारमध्ये पाच वर्षे नोकरी करण्याची सक्ती केली जाणार आहे म्हणजेच त्यांना पाच वर्षे दबावगटात काम करता येणार नाही. परदेशी सरकारसाठी काम करण्यास सरकारी अधिकाऱ्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय ट्विटरवर जाहीर करण्याची पद्धत ट्रम्प सुरूच ठेवणार का, असे विचारले असता ते म्हणाले की, का नाही. ते पुढेही ट्विटरचा वापर करतील. ४५ दशलक्ष लोक ट्विटरवर त्यांचे अनुसारक आहेत ,त्यामुळे थेट संपर्क साधणे त्यांना सोयीचे आहे. ओबामा यांनी रशियाच्या ३५४ हस्तकांची हकालपट्टी केली आहे, तो निर्णय माघारी घेणार का, या मुद्दय़ावर ते म्हणाले की, गुप्तचर माहिती मिळेपर्यंत ट्रम्प तो निर्णय लांबणीवर टाकतील.