न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तांतात गौप्यस्फोट

न्यूयॉर्क : गुप्तवार्ता आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोना महासाथीच्या संभाव्य संकटाबद्दल इशारा दिला होता, मात्र त्यांनी सतत या विषाणूचे गांभीर्य कमी लेखले. त्यांनी याबाबतच्या संदेशांवर नियंत्रण ठेवण्यावर, तसेच आर्थिक आघाडीवर झालेला फायदा संरक्षित करण्यावर लक्ष केंद्रित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संबंधात दिलेले इशारे त्यांनी धुडकावून लावले, असे एका आघाडीच्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या सविस्तर शोधवृत्तांतात म्हटले आहे.

येऊ घातलेली महासाथ आणि तिचे परिणाम याबाबत गुप्तवार्ता विभाग, राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा आणि सरकारी आरोग्य विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी इशारे दिले होते, मात्र ट्रम्प यांनी ते कमी लेखले, असे ‘दि न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तांतात नमूद केले आहे.

‘पडताळणी केली असता असे आढळले की अध्यक्षांना महासाथीच्या संकटाबद्दल इशारा देण्यात आला होता, मात्र अंतर्गत मतभेद, नियोजनाचा अभाव आणि स्वत:च्या अंत:प्रेरणेवरील ट्रम्प यांचा विश्वास यामुळे त्यांनी याला प्रतिसाद दिला नाही’, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.

‘व्हाइट हाऊसचे उच्चपदस्थ सल्लागार, तसेच मंत्रिमंडळातील खात्यांचे तज्ज्ञ आणि गुप्तवार्ता यंत्रणा या सर्वानी खबरदारीचे इशारे देतानाच, करोना विषाणूपासून असलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी आक्रमक कृती करण्याचे आवाहन केले, मात्र अध्यक्ष ट्रम्प यांनी त्याला अतिशय धिमा प्रतिसाद दिला’, असे या वृत्तांतात लिहिले आहे.

‘चीनच्या वुहान शहरात उगम झालेल्या नव्या विषाणूच्या संभाव्य धोक्यांबाबत नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलच्या अधिकाऱ्यांना जानेवारीच्या सुरुवातीलाच इशारे मिळाले होते. या विषाणूचे महासाथीत रूपांतर होऊ शकते असा इशारा परराष्ट्र खात्याच्या साथीचे रोग तज्ज्ञांनी दिला होता; तर संरक्षण गुप्तवार्ता यंत्रणेची लहान शाखा असलेले नॅशनल सेंटर फॉर मेडिकल इंटेलिजन्स हेही याच निष्कर्षांवर पोहचले होते’, याचा न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तांतात उल्लेख करण्यात आला आहे.

काही आठवडय़ांनंतर, नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधील जीव-संरक्षण तज्ज्ञांनी वुहानमध्ये काय घडते आहे याची तपासणी केली, आणि लोकांना घरून काम करण्यास सांगणे सुरू केले. मात्र अध्यक्ष ट्रम्प यांच्या आर्थिक सल्लागारांना ट्रम्प हे चीनसोबत व्यापार कराराच्या वाटाघाटी करत असताना चीनसोबतचे संबंध बिघडतील याची काळजी होती, असा धक्कादायक खुलासा या वृत्तांतात नोंदवण्यात आला आहे.