गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. एकीकडे भारताकडून चर्चेचा मार्ग अवलंबला जात असला तरी चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणी सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थीचा प्रस्ताव दिला आहे.

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सध्या सुरु असलेला सीमावाद सोडविण्यास तयार असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आशियातील दोन मोठ्या देशांना यासाठी मदत करण्याच्या प्रस्तावाचा त्यांनी पुनर्रुच्चार केला. गुरूवारी त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान यावर भाष्य केलं. “भारत आणि चीन या देशांना वादावर तोडगा काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आणि अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागत आहे. जर आम्ही मदत करू शकलो तर ते आम्हाला आवडेल,” असं ट्रम्प म्हणाले.

भारत आणि चीनच्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांदरम्यान लडाखमधील सीमावाद सोडवण्यासाठी एक महत्त्वाची बैठक पार पडली. अशाच वेळ ट्रम्प यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनीदेखील तीनसोबत संतुलित आणि निष्पक्ष संबंध प्रस्थापित करायचं असल्याचं म्हटलं. २०१८ मध्ये ट्रम्प यांनी चीनसोबत व्यापार युद्ध सुरू केलं होतं. त्यानंतर अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले होते. करोना महामारीनंतर अमेरिका आणि चीनमधील संबंध अधिक बिघडले. अनेकदा ट्रम्प यांनी करोनाचा चीनी विषाणू असा उल्लेख केला होता. तसंच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीननं योग्यरितीनं प्रयत्न केला नसल्याचा आरोपही अमेरिकेनं केला होता. परंतु अनेकदा चीननं त्यांच्या या आरोपांचं खंडन केलं होतं.