अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारी (सोमवार) रोजी भारत दौऱ्यावर आले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संपूर्ण देशवासियांनी ट्रम्प यांचं मनापासून स्वागत केलं. मोटेरा स्टेडियममध्ये भारतीयांना संबोधित करताना ट्रम्प यांनी बॉलिवूड चित्रपटांची फार स्तुती केली. यावेळी त्यांनी शाहरुख खान व काजोलच्या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ आणि अमिताभ बच्चन यांच्या ‘शोले’ या चित्रपटांचा उल्लेख केला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “भारतीय चित्रपटांचा आवाका फार मोठा आहे. येथे दरवर्षी जवळपास दोन हजार चित्रपटांची निर्मिती होते. इथल्या चित्रपटांमधील संगीत, भांगडा हे उत्तम दर्जाचे असतात.” बॉलिवूड चित्रपटांविषयी बोलताना त्यांनी ‘शोले’ आणि ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ या दोन चित्रपटांची स्तुती केली. इतकंच नव्हे तर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची नावं आली की जगभरात जल्लोष केला जातो, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं.

अमेरिकेहून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि त्यांची कन्या इव्हान्का ट्रम्प सकाळी थेट गुजरातमध्ये दाखल झाले. भारतात दाखल झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वप्रथम अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. तिथे त्यांनी चरख्यावर सूतकताई केली. यानंतर ट्रम्प यांनी जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा मैदानावरील कार्यक्रमात हजेरी लावली.