अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात येणाऱ्या करांवरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर हल्लाबोल केला आहे. दोन आठवडयांपूर्वी जी २० परिषदेच्याआधी त्यांनी भारताविरोधात ज्या पद्धतीचे टि्वट केले होते तसेच टि्वट त्यांनी आताही केले आहे. भारताकडून अमेरिकन उत्पादनांवर लावण्यात येणारा कर मान्य नाही अशा आशयाचे टि्वट ट्रम्प यांनी केले आहे.

जपान ओसाकामध्ये जी २० परिषदेच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर होणाऱ्या भेटीच्याआधी सुद्धा २७ जूनला त्यांनी कराच्या मुद्यावरुन भारतावर टीका करणारे टि्वट केले होते. अनेक वर्षांपासून अमेरिकन उत्पादनांवर भारतात मोठया प्रमाणावर कर आकारला जात आहे. आता पुन्हा कर वाढवला. हे अजिबात मान्य नाही. करवाढ मागे घेतली पाहिजे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर होणाऱ्या भेटीच्यावेळी हे मुद्दे उपस्थित करेन असे त्यांनी त्यावेळी टि्वटमध्ये म्हटले होते.

ट्रम्प प्रशासनाने व्यापारातील भारताचा प्राधान्य क्रमाचा दर्जा काढून घेतल्यानंतर मोदी सरकारनेही २८ अमेरिकी उत्पादनांवर कर वाढवला. भारत-अमेरिका संबंध बळकट असले तरी व्यापाराच्या मुद्दावरुन दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. व्यापारावरुन अमेरिकेचे भारताबरोबरच नाही तर अन्य देशांबरोबरही वाद आहेत.