वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या २०० अब्ज डॉलर किमतीच्या आयात वस्तूंवर १० टक्के कर लादला असून, वर्षअखेरीस हा कर २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येईल. चीनने या विरोधात उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे.

चीन व अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध शिगेला पोहोचले असून जगातील या दोन मोठय़ा अर्थव्यवस्था आहेत. ट्रम्प यांनी असा आरोप केला, की चीन आपली पक्षपाती व्यापार धोरणे बदलण्यास तयार नाही. नवीन करामुळे अमेरिकी कंपन्यांना चांगली वागणूक मिळेल अशी आशा आहे. या वर्षांत आधी ५० अब्ज डॉलर्सच्या वस्तूंवर कर लादण्यात आला होता.

आता २०० अब्ज डॉलस पर्यंतच्या वस्तूंवर कर लादला आहे. २४ सप्टेंबरपासून चिनी वस्तूंवर १० टक्के कर आकारला जाणार असून तो १ जानेवारीला २५ टक्के करण्यात येईल.

अमेरिकेत लोक सुटीच्या दिवसात जी खरेदी करतात त्यात चिनी वस्तूंचे प्रमाण जास्त असते ते आता कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर चीनने आमच्या शेतकऱ्यांविरोधात किंवा उद्योगांविरोधात सुडाची कारवाई केली तर आम्ही लगेच आयात कर वाढीचा तिसरा टप्पा राबवून २६७ अब्ज डॉलर्स किमतीच्या वस्तूंवर कर लादू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.

सध्या अमेरिकी कंपन्यांना चिनी उद्योगांना तंत्रज्ञान द्यावे लागत आहे. अनेक अन्याय्य धोरणे चीनने राबवली आहेत, असा आरोप अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींनी केला आहे. आम्ही चीनला बराच काळ विनंती करून पाहिली, त्याचा काही उपयोग झाला नाही, त्यामुळे कर लादावा  लागला असे त्यांनी सांगितले.