हिलरींविरोधातील माहिती मिळणार असल्याचे उघड

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र ट्रम्प ज्युनिअर यांनी रशियाच्या वकील नतालिया वेसेलनित्स्काया यांच्याशी झालेल्या संवादाच्या वादग्रस्त ई-मेल मंगळवारी ट्विटरवरून जाहीर केल्या. त्यातून ट्रम्पपुत्राला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधी उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याविरोधी माहिती मिळणार होती हे उघड होत आहे.

रिपब्लिकन पक्षाची अध्यक्षीय निवडणुकीची उमेदवारी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार, हे निश्चित होताच त्यांचे ज्येष्ठ पुत्र ट्रम्प ज्युनिअर यांनी रशियातील सत्ताधाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असलेल्या वकील नतालिया वेसेलनित्स्काया यांची भेट घेतली होती, आणि ‘ही भेट डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याबाबतची काही सनसनाटी माहिती हाती लागण्याच्या हेतूने झाली,’ अशी कबुली ट्रम्पपुत्राने दिल्याने नवाच वाद उभा राहिला आहे. यासंबंधीच्या ई-मेल जनसंपर्क क्षेत्रातील व्यावसायिक रॉब गोल्डस्टोन यांच्याजवळ होत्या. त्यांनी ट्रम्पपुत्राला ३ जून २०१६  रोजी पाठवलेल्या ई-मेलमध्ये रशियाच्या वकिलाकडून त्यांना हिलरी याच्या विरोधातील माहिती मिळेल असे म्हटल्याचे दिसत आहे. ही अत्यंत संवेदनशील माहिती असून ती रशिया आणि रशियाच्या सरकारकडून ट्रम्प यांना मिळणाऱ्या मदतीचा भार असल्याचेही ई-मेलमध्ये म्हटले आहे.