अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु एका भीतीमुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. ट्रम्प यांनी इराणच्या मुख्य अणुकेंद्राला लक्ष्य केलं होतं. तथापि, उपराष्ट्रपती माइक पेंस, संरक्षणमंत्री ख्रिस्तोफर मिलर आणि जॉइंट चीफ ऑफ स्टाफ मार्क माइले यांच्या इशाऱ्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली होती.

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीत इराणची अणुकेंद्र नष्ट करण्याबाबत पर्यायांची विचारणा केली होती. यावेळी ट्रम्प यांच्या सल्लागारांनी हे विनाशकारी पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला होता. तसंच या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होऊ शकतात, असंही त्यांना सांगण्यात आलं होतं. “डोनाल्ड ट्रम्प यांनी या पर्यायांबाबत विचारणा केली होती. परंतु सल्लागारांना त्यांच्या हल्ल्याच्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली. त्यानंतर अखेरिस इराणवर हल्ला न करण्याचा निर्णय घेण्यात आला,” असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

दरम्यान, ओवल कार्यालयात ही बैठक अशावेळी पार पडली जेव्हा ‘इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्दी एजन्सी’नं खुलासा केला की इराणकडे
असलेल्या अणू सामग्रीत अनेक पटींनं वाढ झाल्याचं उघड केलं, असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. यापूर्वीही २० जून २०१९ रोजी ट्रम्प इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. परंतु हल्ल्याच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वीच ते रद्द करण्यात आले. इराणनं अमेरिकेचं एक ड्रोन विमान पाडलं होतं. याविरोधात ट्रम्प यांनी इराणवर हा हल्ला करण्याचा निर्णय घेतला होता.

हे वृत्त अशावेळी समोर आलं आहे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे बायडेन यांचा विजय मान्य करण्यास तयार नाहीत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या झालेल्या निवडणुकांमध्ये जो बायडेन यांचा विजय झाल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्यापही आपला पराभव स्वीकारलेला नाही. निवडणुकांदरम्यान घोटाळा झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता.