“अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश त्यांच्या नागरिकांचे इस्लामी मूलतत्त्ववादी दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करतील,” असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात म्हटलं. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मैदानातील उपस्थितांनी आवाज करत या वक्तव्याला समर्थन दर्शवलं. दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आलेल्या ट्रम्प यांनी गुजरातमधील अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये केलेल्या भाषणात इस्लामी मूलतत्त्ववादी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.

काय म्हणाले ट्रम्प

“दोन्ही देश त्यांच्या नागरिकांचे इस्लामी मूलतत्त्ववादी दहशतवाद्यांपासून संरक्षण करण्यासाठी एकत्र काम करतील. माझ्या नेतृत्वाखाली आम्ही लष्करी बळाचा पूर्णपणे वापर करुन रक्तपात करणाऱ्या आयसिसचा पूर्णपणे खात्मा केला. इराक आणि इराणमधून आम्ही आयसिसला संपवलं आहे. आज आयसिस १०० टक्के नष्ट झाला आहे. आयसिसचा मुख्य नेता आणि संस्थापक असणारा क्रूरकर्मा अल बगदादी मारला गेला आहे,” असं ट्रम्प यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

“दोन्ही देशातील नागरिकांच्या सुरक्षेशी खेळण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,” असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. पाकिस्तानमधून सुरु असणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी माझे प्रशासन काम करत आहे असंही ट्रम्प यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले.

भारताची पाठराखण

“प्रत्येक देशाला आपल्या सिमांचे संरक्षण कऱण्याचा हक्क आहे,” असं सांगत ट्रम्प यांनी भारताने पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशवादी कारवायांविरोधातील मोहिमेला पाठिंबा दर्शवला. पाकिस्तानमधील दहशतवादी गटांची नावे घेत ट्रम्प यांनी भारताच्या शेजारी देशावर थेट निशाणा साधला.

‘Radical Islamic Terrorism’चा उल्लेख…

ट्रम्प यांनी भाषणात ‘Radical Islamic Terrorism’चा उल्लेख करताना वापरलेले ‘Radical Islamic’ हे शब्द ट्विटरवर ट्रेण्ड होऊ लागले. अनेकांनी ट्रम्प यांनी या शब्दांचा उच्चार करतात मैदानात उपस्थित असलेल्यांनी केलेल्या जल्लोषाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. भाजपानेही हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

त्यावेळीही केला होता उल्लेख

अशाप्रकारे ट्रम्प यांनी इस्लामी मूलतत्त्ववादाचा उल्लेख करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २३ सप्टेंबर २०१९ रोजी मोदींच्या अमेरिकेतील ह्य़ुस्टनमधील ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमातील भाषणातही ट्रम्प यांनी इस्लामी मूलतत्त्ववादाचा उल्लेख केला होता. “इस्लामी मूलतत्त्ववादाविरोधात आमचा लढा भारताच्या बरोबरीने सुरू राहील,” असे ट्रम्प यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.

मोदींनी लावून धरला होता ट्रम्प यांचा मुद्दा

ह्य़ुस्टनमधील भाषणात ट्रम्प यांनी आपल्या एका वाक्यामध्ये इस्लामी मूलतत्त्ववादाविरोधाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर मोदींनी त्याच मुद्द्यावरुन आपल्या भाषणातून पाकिस्तानवर तोफ डागली होती. ‘दहशतवादाविरोधात आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांच्या विरोधात निर्णायक लढाई लढण्याची वेळ आली आहे. या लढाईत अध्यक्ष ट्रम्प दहशतवादाविरोधात उभे आहेत, असे मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले. ज्यांना स्वत:चा देश सांभाळता येत नाही, अशा मंडळींनी भारतद्वेषाला केंद्रस्थानी ठेवले. दहशतवादाचे समर्थन देणाऱ्यांना सारे जग ओळखून आहे. ९/११ किंवा २६/११ चे सूत्रधार कोठे सापडतात हे सर्वांना ठाऊक आहे,” या मोदींच्या विधानाला उपस्थितांकडून मोठी दाद मिळाली होती.