News Flash

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तिसऱ्यांदा मध्यस्थीची तयारी

या आठवडय़ात तिसऱ्यांदा ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला.

काश्मीरप्रकरणी भारत-पाकिस्तानला प्रस्ताव

शुभजित रॉय, एक्स्प्रेस वृत्तसेवा,

न्यू यॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवडय़ात तिसऱ्यांदा काश्मीरचा राग आळवला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांची भेट झाली त्यावेळी काश्मीर प्रश्नावर आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी या प्रश्नावर आपण लवाद अथवा मध्यस्थामार्फत मदतीचा प्रस्ताव दोन्ही देशांसमोर ठेवला असून त्यामधून या दोन्ही देशांनीच मार्ग काढावयाचा आहे, असे ट्रम्प म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे नेते आपले चांगले मित्र आहेत, यामधून मार्ग काढा असे आपण दोघांनाही सांगितले, त्यांनी यामधून मार्ग काढावयाचा आहे, असे ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा संदर्भ देऊन सांगितले.

न्यू यॉर्कमध्ये एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात मदत करण्याचा राग आळवला. ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर प्रथमच ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या आठवडय़ात तिसऱ्यांदा ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन्ही देशांची इच्छा असल्यास आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत, असे त्यापूर्वी ट्रम्प म्हणाले होते. मोदी आणि खान यांचे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भाषण होणार असून त्यापूर्वी एक दिवस अगोदर ट्रम्प यांनी प्रस्ताव ठेवला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी आपली फलदायी चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. भारत-पाकचा सन्मान राखून आम्ही काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. आपण जेवढी मदत करू शकतो तेवढा प्रस्ताव ठेवला, लवाद असो वा मध्यस्थी किंवा अन्य काही,  शक्य तेवढी मदत करण्यास तयार आहोत, असे ट्रम्प म्हणाले.

ड्रोनद्वारे शस्त्रपुरवठय़ावर भारताची नजर

जम्मू : पंजाबमध्ये शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी पाकिस्तान चिनी बनावटीच्या ड्रोनचा वापर करीत असल्याची गंभीर दखल लष्कर आणि सीमा सुरक्षा दलाने घेतली आहे. संपूर्ण भारत-पाकिस्तान सीमेवर आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सावधानतेचा इशारा दिला आहे. भविष्यात अशा प्रकारची हवाई घुसखोरी होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा ठेवण्याचे आदेश सीमा सुरक्षा दलास देण्यात आले आहेत. जीपीएस बसविलेल्या ड्रोनची १० किलो वजन उचलण्याची क्षमता आहे, अशी ड्रोन पाकिस्तानातून सात-आठ वेळा आली असून त्यांनी शस्त्रे टाकली आहेत, मात्र तरणतारण जिल्ह्य़ातून ती शस्त्रे हस्तगत करण्यात आली असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

घुसखोरीविरोधी डोवाल यांची सूचना

श्रीनगर/ जम्मू : दहशतवादी भारतात मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी करण्याच्या वृत्ताच्या पाश्र्वभूमीवर; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर घुसखोरीविरोधी यंत्रणेने ‘अतिदक्षता’ बाळगावी आणि जम्मू- काश्मीरमधील महत्त्वाच्या आस्थापनांचे संरक्षण करावे, अशा सूचना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गुरुवारी केल्या. काश्मीर खोऱ्याच्या दिवसभराच्या दौऱ्यावर असलेल्या डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांच्या आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक झाली. डोवाल यांनी काश्मीर खोऱ्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती आणि जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता याबाबत चौकशी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 3:48 am

Web Title: donald trump third time offer for mediation on kashmir issue zws 70
Next Stories
1 पीडित विद्यार्थिनीला अटक हाच भाजपचा न्याय का? प्रियंका यांचा सवाल
2 जाक शिराक यांचे निधन
3 ब्रिटनच्या पंतप्रधानांचा संसदेत पुन्हा पराभव
Just Now!
X