मेक्सिको सीमेवर कोटय़वधी डॉलर्स खर्च करून भिंत बांधण्याच्या प्रस्तावावर आपण ठाम असून त्यासाठी अमेरिकी सरकार टाळेबंदीमुळे वर्षभर बंद राहिले तरी त्याची तयारी आहे, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच्या बैठकीनंतर सांगितले की, भिंत बांधण्यासाठी तरतुदीवर आपण ठाम असून त्यासाठी सरकारची वर्षभर टाळेबंदी झाली तरी आपण मागे हटणार नाही.

अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाचा भिंतीसाठी विधेयकातील तरतुदीपेक्षा जास्तच निधी देण्यास विरोध असून त्यामुळे सरकारच्या आर्थिक तरतुदी रोखण्यात आल्या असून टाळेबंदीचा दोन आठवडे सुरू असलेला पेच अजून मिटलेला नाही. वर्षभर टाळेबंदी होईल असे वाटत नाही पण त्यासाठी माझी तयारी आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

सीमेवरील सुरक्षा महत्त्वाची असून आज ना उद्या लोकांना याचा विचार करावा लागणार आहे. आम्हाला जे करणे गरजेचे आहे ते आम्ही करूच असे ते म्हणाले. अनेकांना वेतनाविना काम करावे लागत असून अनेक जण बिनपगारी रजेवर आहेत तरी या संघराज्य कर्मचाऱ्यांचा अमेरिकी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा आहे असा दावा करून ते म्हणाले की, या  लोकांना सध्या कामाचे पैसे मिळत नाहीत पण त्यातील अनेक जण आमच्या भूमिकेचे समर्थक आहेत, असे ते म्हणाले. प्रतिनिधिगृहात आता डेमोक्रॅटिक पक्षाचे संख्याबळ वाढले असून टाळेबंदीवर कोणताही तोडगा सध्या दृष्टिपथात नाही. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प  कुठल्याही सवलती देण्यास तयार नाहीत.