13 December 2018

News Flash

किम जोंग यांच्यापेक्षा माझ्याकडे अण्वस्त्रांची मोठी कळ

उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी अमेरिकेपुढे सर्व पर्याय खुले

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

माझ्याकडची अण्वस्त्रांची कळ (बटन) उत्तर कोरियापेक्षा जास्त मोठी व शक्तिशाली आहे, असा इशारा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. व्हाइट हाऊसने म्हटले आहे की, उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी अमेरिकेपुढे सर्व पर्याय खुले आहेत.

उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांनी असे म्हटले होते की, माझ्या मेजावर अण्वस्त्रांची कळ आहे ती मी केव्हाही दाबू शकतो. अमेरिकेत कुठेही आमची अण्वस्त्रे विनाश घडवू शकतात. त्यावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले आहे. गेल्या वर्षभरात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अण्वस्त्र वापरण्याचे इशारे दिले आहेत. माझ्या मेजावर अण्वस्त्रांचे बटन सतत असते, किम जोंग उन यांनी म्हटले असले तरी त्यांच्या खंगलेल्या उपासमारीने मरणासन्न अवस्थेत असलेल्या देशातील कुणीतरी त्यांना माझ्याकडे अण्वस्त्रांचे चांगले मोठे बटन आहे व ते छान चालते याची जाणीव करून द्यावी, असा टोमणा ट्रम्प यांनी मारला आहे.

दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या भाषणात किम यांनी म्हटले आहे की, आमच्या देशाला मोठय़ा प्रमाणावर अण्वस्त्रांची गरज आहे.आम्हाला आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचीही आवश्यकता असून आम्ही लवकरच क्षेपणास्त्रे तैनात करणार आहोत.

व्हाइट हाऊसने उत्तर कोरिया हा जागतिक धोका असल्याचे म्हटले असून अमेरिकेसोबत इतर देशांनीही त्या देशाविरोधात आघाडीमध्ये सामील व्हावे असे म्हटले आहे. व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स यांनी सांगितले की, उत्तर कोरिया ही जागतिक डोकेदुखी असल्यानेच प्रत्येकाने त्या देशाविरोधात उभे ठाकले पाहिजे. इतर देशांनीही एकत्र आले पाहिजे. अमेरिकेने या प्रकरणी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.

किम यांची एकाधिकारशाही असलेल्या उत्तर कोरियावर अमेरिकी प्रणित आंतरराष्ट्रीय आघाडीने लादलेल्या र्निबधांचा दबाव पडत आहे. उत्तर कोरिया २०१८ मधील दक्षिण कोरियाच्या पेयाँगचँग शहरात होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकंमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यावेळी काही चित्र पालटू शकते.

दक्षिण कोरियाने हा प्रस्ताव स्वीकारला असून उच्चस्तरीय बोलणीची तयारी दर्शवली आहे. उत्तर कोरियाने गेल्या फेब्रुवारीपासून २३ क्षेपणास्त्रे सोडली असून २९ नोव्हेंबरला त्या देशाने पूर्ण अण्वस्त्रधारी झाल्याचा दावा केला होता.

दहशतवादविरोधी लढाईतील दुटप्पीपणामुळे पाकिस्तानची लष्करी मदत बंद – निक्की हॅले

दहशतवादा विरोधातील लढाईत पाकिस्तान दुटप्पीपणा करीत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. दहशतवाद्यांवर निर्णायक कारवाई केली तरच पाकिस्तानला अमेरिकी डॉलर्स मिळतील अन्यथा नाही, अशी भूमिकाही पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आली आहे. पाकिस्तानची परदेशी लष्करी मदत बंद करण्याची घोषणा अमेरिकेने काल केली होती.

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ख्रिसमसची सुटी संपताच पाकिस्तानला अमेरिकेने कोटयवधी डॉलर्स देऊनही दहशतवाद विरोधी कारवाईत त्या देशाने फसवणूकच केली आहे, असा असा आरोप करून पाकिस्तानची २५५ दशलक्ष डॉलर्सची मदत बंद करण्याचे सूतोवाच ट्विटरवर केले होते. अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅले यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन करताना सांगितले, की पाकिस्तानची मदत बंद करण्यामागची कारणे स्पष्ट आहेत. पाकिस्तानने इतकी वर्षे दहशतवादाविरोधातील लढाईत दुटप्पीपणा केला आहे. पाकिस्तानला आम्ही मदत दिली पण त्यांनी अफगाणिस्तानातील आमच्या सैन्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय दिला. ट्रम्प प्रशासनाला हा दुटप्पीपणा मान्य नाही. दहशतवादाविरोधी लढाईत आताच्या प्रशासनाला खूप मोठे सहकार्य अपेक्षित असताना पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे सुरूच ठेवले. त्यामुळे ट्रम्प यांनी पाकिस्तानचा जास्तीत जास्त निधी रोखण्याचे ठरवले आहे. पाकिस्तानचे दहशतवाद्यांना आश्रय देणे एवढय़ाच मुद्दय़ाशी याचा सगळ्याचा संबंध आहे. परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तया हिथर नोएर्ट यांनी सांगितले की, पाकिस्तान हा महत्तवाचा भागीदार असून त्यांनी दहशतवादविरोधी कारवाईत अमेरिकेला जास्त साथ देणे आवश्यक होते व आहे. हक्कानी नेटवर्कवर पाकिस्तानने कारवाई करावीच शिवाय इतर दहशतवाद्यांनाही नेस्तनाबूत क रावे अशी अमेरिकेची अपेक्षा आहे.

पाकिस्तानची मदत बंद करण्याच्या निर्णयावर नोएर्ट यांनी सांगितले, की २५५ दशलक्ष डॉलर्सची पाकिस्तानला दिली जाणारी लष्करी मदत बंद करण्याचा निर्णय ऑगस्टमध्ये घेण्यात आला. पाकिस्तानने गांभीर्याने प्रयत्न करून दहशतवाद विरोधी कारवाई केली तर त्यांना ती मदत परत मिळवता येईल. परराष्ट्र मंत्री रेक्स टिलरसन, संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस यांनी गेल्या दोन महिन्यात पाकिस्तानला भेट दिली होती. व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव सारा सँडर्स यांनी सांगितले, की पाकिस्तान दहशतवादाविरोधात बरेच काही करू शकतो, त्यांनी त्याविरोधात कारवाई वाढवली पाहिजे एवढे हे साधे आहे. दहशतवादाविरोधातील लढाईत वचने पाळण्यात पाकिस्तान आतापर्यंत अपयशी ठरला आहे. अमेरिकेने पंधरा वर्षांत दिलेल्या ३३ अब्ज डॉलर्सच्या मदतीचा पै पैशाचा हिशेब देण्याची पाकिस्तानची तयारी असल्याचे आव्हान परराष्ट्र मंत्री  ख्वाजा असीफ यांनी दिले आहे. पाकिस्तानने अमेरिकी राजदूत डेव्हीड हॅली यांना बोलावून मदत थांबवण्याच्या निर्णयावर निषेध व्यक्त केला होता.

First Published on January 4, 2018 1:58 am

Web Title: donald trump tweets about nuclear war with north korea