सात मुस्लीमबहुल देशांतील नागरिकांना आणि जगातील कुठल्याही देशातून येणाऱ्या निर्वासितांना अमेरिकेत येण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घातलेली बंदी उठवावी असे आवाहन संयुक्त राष्ट्राचे महासचिव अॅंटोनियो गटेरर्स यांनी केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे जगभरात राग आणि चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या देशाला दहशतवादापासून सुरक्षित ठेवण्याचा हा योग्य उपाय नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही गोष्ट विचारात घेऊन त्वरित आपला निर्णय मागे घ्यावा असे ते म्हणाले आहे.

ज्या देशातील नागरिकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घातली आहे केवळ तिथेच नव्हे तर सर्व जगभरातच दहशतवादी शक्ती फोफावत असल्याचे त्यांनी म्हटले. सर्व सामान्यांना येण्यास बंदी घातली तरी दहशतवादी लोक घुसखोरी करणार नाहीत याचा काय भरवसा असा सवाल त्यांनी ट्रम्प यांना केला आहे. जर दहशतवाद्यांना आपले लोक अमेरिकेत घुसवायचे असेल तर ज्या देशांमध्ये संघर्ष सुरू आहे त्या देशातील पासपोर्टवर आपले दहशतवादी पाठवण्याची चूक ते कधीही करणार नाहीत असे त्यांनी म्हटले. जर संयुक्त राष्ट्राने अमेरिकेविरोधात बोलले तर अमेरिका निधी देणार नाही तेव्हा तुम्ही काय कराल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले जी गोष्ट घडली नाही त्याबद्दल बोलून काय उपयोग आहे. सध्या आपल्यासमोर सर्वात मोठा प्रश्न निर्वासित कुटुंबांचा आहे असे ते म्हणाले. त्या कुटुंबाना लवकरच आसरा मिळणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

अमेरिकेने नेहमीच निर्वासितांच्या कल्याणाचा विचार केला आहे तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील हा विचार करावा असे ते म्हणाले आहे. संयुक्त राष्ट्राबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे मत काही फारसे अनुकूल नाही. संयुक्त राष्ट्र म्हणजे गप्पाटप्पा मारणाऱ्यांचा कट्टा बनल्याचे विधान त्यांनी केले होते त्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांच्या आवाहनाला ते कितपत प्रतिसाद देतात याबाबत शंकाच आहे. दरम्यान, अमेरिकेतील मुख्य आयटी कंपन्यांनी एकत्र येऊन मुस्लिमांवरील असलेली प्रवास बंदी उठवावी यासाठी एक जाहीर पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, फेसबुक यांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी काढलेल्या आदेशाचे पालन न करण्याचा निर्णय अमेरिकेच्या तत्कालीन महाधिवक्ता येट्स यांनी घेतला होता. आपल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे ट्रम्प यांनी त्यांना पदावरुन काढून टाकले.