आखातामध्ये सौदीच्या तेल प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टि्वट करुन इराणला इशारा दिला आहे. अमेरिकेने या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार ठरवले आहे. पण इराणने आरोप फेटाळून लावले आहेत. अमेरिकेचे तळ, युद्धनौका आमच्या मिसाइलच्या रेंजमध्ये असल्याची उलटी धमकी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी इराणने अमेरिकेचे मानवरहित ड्रोन पाडल्यानंतरही असाच तणाव निर्माण झाला होता.

त्यावेळी अमेरिकेने प्रतिहल्ल्याची सर्व तयारी केली होती. पण अखेरच्या क्षणी ट्रम्प यांनी माघार घेतली. मानवरहित विमानाच्या मोबदल्यात कोणाचे प्राण घेणे आपल्याला योग्य वाटले नाही असे कारण त्यावेळी ट्रम्प यांनी दिले होते. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणविरोधात लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. अरामकोच्या तेल प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यामुळे सौदीचे तेल उत्पादन निम्म्यावर आले आहे.

सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पावर हल्ला झाला आहे. यामागचा गुन्हेगार आम्हाला माहित आहे असे जर आम्ही म्हणत असू तर त्यामागे कारण आहे. आम्ही तयार आहोत. हल्ल्यामागे कोण आहे ते आम्हाला किंगडमकडून ऐकायचे आहे असे टि्वट ट्रम्प यांनी रविवारी केले. इराणचा पाठिंबा असलेल्या येमेनमधील हौथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तेल पुरवठयावर कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी अमेरिका मित्र देशांच्या मदतीने आवश्यक पावले उचलेल. या आक्रमकतेसाठी इराणला जबाबदार ठरवले जाईल असे अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्याने सांगितले.

काय परिणाम झाला
अरामकोच्या दोन तेल क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर सौदी अरेबियाने निम्मं तेल उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी सरकारच्या या निर्णयामुळे जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी दिवसाला ५.७ मिलियन बॅरल (एक बॅरल म्हणजे १५९ लिटर) म्हणजेच ५ टक्के उत्पादन कमी होणार आहे, असे सौदीच्या अरामकोने म्हटले आहे. अमेरिकेच्या ऊर्जा माहिती केंद्राच्या माहितीनुसार ऑगस्टमध्ये सौदी अरेबियाचे तेल उत्पादनाचे प्रमाण दिवसाला ९.८५ मिलियन बॅरल होते. दरम्यान, अरामकोच्या दोन क्षेत्रांवर झालेल्या हवाई हल्ल्याचा परिणाम गॅस उत्पादनावरही झाल्याचे सौदीने म्हटले आहे. “हल्ल्यामुळे गॅस उत्पादनाही थांबले आहे. याचा परिणाम म्हणून इथेन आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ५० टक्क्यांनी कमी होणार आहे”, अशी माहिती सौदीचे ऊर्जा मंत्री अब्दुलअजीज बिन सलमान यांनी दिली आहे.