News Flash

ट्रम्प मोदींशी काश्मीर प्रश्नी चर्चा करणार

ट्रम्प यांनी पुन्हा मध्यस्थीचा प्रस्ताव मांडला असून तो भारताने यापूर्वीच फेटाळला आहे.

| August 22, 2019 02:53 am

जी-७ देशांच्या बैठकीत फ्रान्समध्ये भेट

पीटीआय, वॉशिंग्टन

जी ७ देशांच्या फ्रान्समध्ये  होणाऱ्या बैठकीवेळी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्नावर चर्चा करणार आहेत. भारत व पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत करण्याचा त्यांचा यामागचा हेतू आहे असे सांगण्यात आले.

व्हाइट हाऊस येथे मंगळवारी रुमानियाचे अध्यक्ष क्लॉस लोहानिस यांचे स्वागत करताना त्यांनी सांगितले की, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर दोन्ही देशात निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी आपण मदत करण्यास तयार आहोत. अप्रत्यक्षपणे ट्रम्प यांनी पुन्हा मध्यस्थीचा प्रस्ताव मांडला असून तो भारताने यापूर्वीच फेटाळला आहे. काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न असून काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेणे ही अंतर्गत बाब असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी स्वतंत्रपणे दूरध्वनीवर चर्चा केली होती त्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, आठवडा अखेरीस फ्रान्समध्ये जी ७ देशांची बैठक होणार आहे त्यावेळी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काश्मीर प्रश्नावर चर्चा करू.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान नुकतेच भेटून गेले आहेत, दोन्ही नेत्यांशी आपला चांगला संपर्क आहे. काश्मीरमधील परिस्थिती कठीण आहे. भारत व पाकिस्तान हे हॉवित्झर तोफा व इतर शस्त्रांस्त्राचा वापर करीत आहेत.  हे बराच काळ सुरू आहे, त्यामुळे या दोन देशांना हा संघर्ष थांबवण्यासाठी मदत करण्याची आपली तयारी आहे. त्यामुळे आपण मध्यस्थी किंवा इतर मार्गाने हा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करू. सध्या तरी भारत व पाकिस्तान हे कट्टर शत्रू म्हणून उभे ठाकले आहे त्यामुळे परिस्थिती कठीण आहे, तेथील स्थिती स्फोटकच आहे, असेही ट्रम्प म्हणाले.

पंतप्रधान इम्रान खान व नरेंद्र मोदी या दोघांशी आपली चर्चा झाली आहे ते महान नेते आहेत त्यांचे त्यांच्या देशावर प्रेम आहे. उपखंडात भारत-पाकिस्तानच्या द्विपक्षीय चर्चेचा मुद्दा अनेक वर्षे सुरूच आहे. भारत व पाकिस्तान यांच्यात धर्मामुळे तणाव असून धर्म हा गुंतागुंतीचा विषय आहे. एकीकडे मुस्लीम तर दुसरीकडे हिंदू आहेत. सध्या ते गुण्यागोविंदाने राहत आहेत असे नाही. पण तसे घडणे आवश्यक आहे.

      – डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 2:53 am

Web Title: donald trump will discuss kashmir issue with narendra modi zws 70
Next Stories
1 काश्मीर हा भारत-पाकिस्तानचा प्रश्न- बोरिस जॉन्सन
2 अपॉफिस लघुग्रहाच्या आघाताचा पृथ्वीला धोका
3 अफगाणिस्तानातून पूर्णपणे सैन्य माघारी नाही
Just Now!
X