अमेरिकी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांचे मत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या शुक्रवारच्या प्रस्तावित भाषणात इराणसंदर्भातील नवे धोरण जाहीर करणार आहेत. त्यात ट्रम्प इराणबरोबर अमेरिकेने २०१५ साली केलेला अणुकरार रद्द करण्याची किंवा इराणवर पुन्हा निर्बंध लादण्याची शक्यता कमी आहे. मात्र हा करार अमेरिकेला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हितावह नसल्याची भूमिका ट्रम्प घेऊ शकतात, असे मत अमेरिकी परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी व्यक्त केले आहे.

इराणबरोबर २०१५ साली अमेरिकेसह सहा देशांनी अणुकरार केला होता. त्यात इराणने अण्वस्त्र कार्यक्रमाला आवर घालण्याचे मान्य केले होते. तर त्याच्या बदल्यात अमेरिकेने इराणवरील निर्बंध मागे घेण्याचे मान्य केले होते. मात्र अमेरिकेचे नवे अध्यक्ष ट्रम्प यांना त्यांच्या पूर्वीचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेला हा करार चुकीचा वाटतो. त्याने अमेरिकेच्या हितसंबंधांचे नुकसान झाल्याचे ट्रम्प यांचे मत आहे.

ट्रम्प यांच्या भाषणापूर्वी व्हाइट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ओबामा यांचे इराण धोरण आंधळेपणाचे व अमेरिकी हितसंबंधांकडे दुर्लक्ष करणारे होते, असे म्हटले आहे. इराण अणुकराराची पायमल्ली करत असून क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. तसेच इराण मध्य-पूर्वेतील (पश्चिम आशिया) सुन्नी कट्टरतावादाला खतपाणी घालत आहे, असे अमेरिकने म्हटले आहे.

त्या पाश्र्वभूमीवर ट्रम्प या करारातून माघार घेणार नाहीत. मात्र तो अमेरिकेला हितावह नसल्याची भूमिका घेतील, असे टिलरसन यांनी म्हटले आहे. जाणकारांच्या मते ट्रम्प हा करार नव्याने प्रमाणित करण्यास नकार देतील. हा करार अमेरिकी अध्यक्षांनी दर ९० दिवसांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे. त्यानुसार येत्या रविवारी ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी करणे अपेक्षित आहे. अध्यक्षांनी नव्याने प्रमाणीकरण केले नाही तर तर हा प्रश्न अमेरिकी काँग्रेसकडे जातो. त्यांनी ६० दिवसांत त्यावर निर्णय घेणे अपेक्षित असते. ट्रम्प यांनी हा करार रद्द केला नाही तरी इराणविषयक धोरण अधिक कठोर करण्यात येईल, असे हे संकेत असल्याचे मानले जात आहे.