न्यू मेक्सिकोत ट्रम्प विरोधक व पोलीस चकमक
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील अध्यक्षीय स्पर्धेतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनची प्राथमिक फेरी सहज जिंकली असून ते आता उमेदवारीच्या आणखी जवळ पोहोचले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीत आघाडीवर असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्याशी त्यांची नोव्हेंबरमध्ये लढत होणार हे जवळपास स्पष्ट आहे.
ट्रम्प यांचा आताचा विजय हा निदर्शकांनी न्यू मेक्सिकोतील अलबुकर्क येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी घातलेला गोंधळ व त्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई यामुळे गाजला आहे. वॉशिंग्टनमध्ये त्यांना ७६.२ टक्के मते पडली असून आता त्यांना विजयासाठी दहापेक्षाही कमी प्रतिनिधी मतांची गरज आहे. ट्रम्प यांच्याकडे आता १२२९ प्रतिनिधी मते आहेत व उमेदवारीसाठी १२३७ प्रतिनिधी मते लागतात. वॉशिंग्टनमध्ये त्यांना ४० प्रतिनिधी मते मिळाली आहेत. चार सदस्यांची मते अनिर्णित असून त्यामुळे ट्रम्प यांची आकडेवारी वाढणार आहे. ट्रम्प यांना ७६ टक्के तर टेक्सासचे सिनेटर टेड क्रूझ व ओहिओचे गव्हर्नर जॉन कासिच यांना प्रत्येकी दहा टक्के मते पडली आहेत. निवृत्त न्यूरोसर्जन बेन कार्सन यांना ४ टक्के मते मिळाली आहेत. ७ जूनला कॅलिफोर्निया, न्यूजर्सी, न्यू मेक्सिको, मोंटाना व साऊथ डाकोटा या लढती होत असून त्या महत्त्वाच्या आहेत. न्यू मेक्सिको येथे ट्रम्प विरोधक व पोलीस यांच्यात धुमश्चक्री झाली. पोलिसांवर दगड व जळते कपडे फेकण्यात आले. निदर्शकांनी ट्रम्प यांचे भाषण उधळून लावले. नंतर सगळ्यांना बाहेर काढण्यात आले. रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांची आघाडी कायम आहे सुरुवातीला त्यांना सतरा प्रतिस्पर्धी होते. डेमोक्रॅटिक पक्षात अजून तीन उमेदवारात स्पर्धा कायम असली तरी क्लिंटन यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. बेर्नी सँडर्स यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. कॅलिफोर्नियातील प्रचारात सँडर्स यांनी सांगितले की, आम्ही ट्रम्प यांना अमेरिकेचे अध्यक्ष होऊ देणार नाही.