हरयाणातील महिला काँग्रेस नेत्याच्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. विद्या देवी असे या महिला काँग्रेस नेत्याचे नाव आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन पुनर्जीवित करण्यासाठी पैसा आणि दारु पुरवा असे आवाहन त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले. हरयाणातील जींदमध्ये त्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या.

“शेतकरी आंदोलन सुरु ठेवण्यासाठी पैसा, भाज्या, तूप आणि दारु पुरवा” असे वक्तव्य त्यांनी केले. या बैठकीला साफीदोनचे काँग्रेस आमदार सुभाष गांगोली आणि अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते. बैठकीच्या कार्यक्रमाचे मीडियाकडून रेकॉर्डिग सुरु असल्याचे जेव्हा काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी विद्या देवी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण विद्या देवी यांनी आपले भाषण सुरुच ठेवले.

दारु का पुरवली पाहिजे? त्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. “आंदोलनाकडे प्रत्येक प्रकारची लोक आकर्षित होतात. त्यांना वेगवेगळया प्रकारच्या सुविधा हव्या असतात. आपल्याला वेगळया पद्धतीने आंदोलनाला बळकट करायचे आहे” असे विद्या देवी म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ जींदमध्ये त्यांनी रॅलीची घोषणा केली. यामुळे काँग्रेसला दिशा आणि नवीन जीवन मिळेल.

“जींद जिल्ह्यात आपण पदयात्रा आयोजित करु. त्यामुळे मोठया संख्येने लोक गोळा होतील आणि काँग्रेसला नवीन जीवन मिळेल. निवडणुकीतील पराभवानंतर आपण आपले अस्तित्व हरवून बसलो आहोत. शेतकऱ्यांच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे आंदोलन पुनर्जीवित झाले आहे. आता आपल्याला ते चालवायचे आहे” असे विद्या देवी म्हणाल्या.