सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिरापाठोपाठच अयोध्येत मशीद उभारण्याची तयारीही आता सुरू झाली आहे. अयोध्येत मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाकडून इन्डो इस्लामिक कल्चर या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून मशिदीच्या निर्मितीचा खर्च उभा केला जाणार आहे. त्यामुळे या ट्रस्टला आता देणग्या येण्यास सुरूवात झाली आहे. लखनऊ विद्यापीठाच्या एका कर्मचाऱ्याने मशिदीच्या बांधकामासाठी देणगी दिली आहे.
शनिवारी रोहित श्रीवास्तव या लखनऊ विद्यापिठाच्या कर्मचाऱ्याने इंडो-इस्लामिक कल्चरल फाउंडेशनला (आयआयसीएफ) २१,००० रुपयांची देणगी दिली. रोहित श्रीवास्तव हे पहिले असे देणगीदार आहेत जे इंडो इस्लामिक कल्चर ट्रस्टचे सदस्य नाहीत.
अयोध्येत मशीद उभारण्यासाठी धनीपुर गावात पाच एकर जागा देण्यात आली आहे. या परिसरातील संकुलामध्ये एक मशीद, रुग्णालय, ग्रंथालय आणि इंडो-इस्लामिक सांस्कृतिक संशोधन केंद्र, संग्रहालय आणि सामुदायिक स्वयंपाकघर असणार आहे.
“जेव्हा ट्रस्टसाठी पहिल्यांदा देणगी देण्यात आली, हा आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. कारण ही देणगी लखनऊच्या रोहित श्रीवास्तव यांनी दिली आहे. त्यांच्या कृतीने लखनऊ, अयोधेच्या गंगा-यमुनेच्या संस्कृतीचे उत्तम उदाहरण दिले आहे. या देणगीने ट्रस्टमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. यामुळे अयोध्येत पाच एकर जागेवर निर्माण करण्यात येणाऱ्या परिसराचे लक्ष्य पूर्ण करण्याचा दिशेने योग्य वाट मिळाली आहे,” असं आयआयसीएफचे सचिव अतहर हुसैन यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 5, 2020 11:37 am