अयोध्येतील राममंदिराच्या बांधकामासाठी शुक्रवारपासून देणग्या गोळा करण्याच्या देशव्यापी मोहिमेला सुरुवात झाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यापोटी पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम देणगी म्हणून दिली.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या कुटुंबीयांकडून यापूर्वीच पाच लाखांहून अधिक रक्कम देणगी म्हणून देण्यात आली आहे. त्यापूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत वाल्मीकी मंदिरात पूजा केली. राय बरेलीच्या बैसवारा जिल्ह्य़ातील तेजगावचे माजी आमदार सुरेंद्र बहादूर सिंह यांनी सर्वाधिक म्हणजे एक कोटी, ११ लाख, ११ हजार १११ रुपयांच्या देणगीचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केला.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देणगी गोळा करण्याची मोहीम शुक्रवारपासून सुरू करण्यात आली असून रामनाथ कोविंद यांनी आपल्यातर्फे आणि आपल्या कुटुंबीयाच्या वतीने पाच लाख १०० रुपयांची देणगी दिली, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोककुमार यांनी सांगितले.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पत्नी उषा नायडू यांनी यापूर्वीच पाच लाख, ११ हजार रुपयांची देणगी दिली आहे. अनेक राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनीही देणग्या दिल्याचे वृत्त आहे.