News Flash

देशात गाढवं नामशेष होण्याच्या मार्गावर; आरोग्यवर्धक असल्याचं सांगत ‘या’ राज्यात होतेय गाढवाच्या मांसाची विक्री

या प्रकरणात तपासाचे आदेश देण्यात आलेत

प्रातिनिधिक फोटो (फोटो सौजन्य: एएनआय)

सामान्यपणे कुठल्याही बांधकामाच्या ठिकाणी किंवा रस्त्यावर दिसून येणारं गाढव हा नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र देशातील नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीत गाढवाचा समावेश करण्यात आला आहे. गाढवांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात असल्याने ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गाढवाचे मांस खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो असा समज असल्याने देशातील काही भागांमध्ये गाढवाच्या मांसाला मागणी आहे. या कारणामुळेही गाढवांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) सांगण्यानुसार गाढवाचे मांस हे खाण्यासाठी वापरु शकत नाही. गाढवाचे मांस खाणे कायद्यानुसार चुकीचं आहे. याचसंदर्भात आता आंध्र प्रदेशमध्ये तपास सुरु असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

आंध्रमधील काही ठिकाणी गाढवाचे मांस खाल्ल्याने कंबरदुखी, अस्थमा आणि श्वसनाच्या आजारासंदर्भातील व्याधींपासून आराम मिळतो असा समज आहे. तसेच लैंगिकशक्ती वाढवण्यासाठीही गाढावाचे मांस फायद्याचे असल्याचे समजले जाते. मात्र प्राणीमित्र म्हणून काम करणाऱ्या गोपाल आर. सुरबथुला यांनी आयएएनएसशी बोलताना, “गाढवाचे मांस प्रकासम, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि गुंटूर जिल्ह्यांमध्ये खाल्लं जातं. दर गुरुवारी आणि रविवारी येथे गाढवाच्या मांसाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अनेक सुशिक्षित लोकंही हे मांस विकत घेताना दिसतात. या मांसांसाठी आठवड्याला १०० हून अधिक गाढवांना ठार केलं जातं,” अशी माहिती दिली.

गाढावांचे मांस विकण्याच्या या बेकायदेशीर व्यापारामध्ये सहभागी असणाऱ्या व्यक्तींकडून कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रामधून ही गावढं मागवण्यात येतात. या प्रकरणामध्ये प्राणीमित्रांनी आता तक्रार दाखल केली असून दुसऱ्या राज्यांमधून आणण्यात येणाऱ्या प्राण्यांसंदर्भातही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. सुरबथुला यांनी दिलेल्या माहितीनुसार गाढवाचे मांस ६०० रुपये किलोने विकले जाते.

प्राण्यांसंदर्भात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गाढवाचे मांस खाण्याची सवय प्रकासम जिल्ह्यातील स्टुअर्टपुरममधून सुरु झाली. हा प्रदेश चोरांचा अड्डा असल्याचं सांगण्यात येते. येथील एका प्रचलित दाव्यानुसार गाढवाचं रक्त प्यायल्याने दूर अंतरापर्यंत पळण्याची क्षमता वाढते, असं सांगितलं जायचं. बंगालच्या खाडीमध्ये मासे पकडण्यासाठी जाण्याआधी काही जण गाढवाचे रक्त पिऊन जायचे असंही काहीजण सांगतात.

आंध्र प्रदेशच्या पशुपालन विभागाच्या सहाय्यक निर्देशक धनलक्ष्मी यांनी गाढवांची कत्तल करणं कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत यासंदर्भात आपल्याकडे गाढवांची कत्तल आणि त्याच्या मांसाचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2021 3:53 pm

Web Title: donkey meat consumption in andhra pradesh rising as aphrodisiac healer scsg 91
Next Stories
1 “काँग्रेसमध्ये आलो तेव्हा वाटलं होतं…”, २ वर्षांत हार्दिक पटेल काँग्रेसला वैतागले!
2 देशाने खेळणी उत्पादनात व्हावे आत्मनिर्भर, मोदींनी केले अवाहन
3 राहुल गांधींची मोदी सरकार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका, म्हणाले…
Just Now!
X