राममंदिरासाठी भाजपने केलेल्या आंदोलनावरून होणाऱ्या टीकेने दबून जाऊ नका, उलट त्या आंदोलनाचा अभिमानच बाळगा, असे आक्रमक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते व या आंदोलनाचे शिल्पकार लालकृष्ण अडवाणी यांनी भाजप स्थापना दिन कार्यक्रमात शनिवारी केले.
अयोध्येत आमचा बाबरी मशीद पाडण्याचा इरादा नव्हता, उलट आम्ही लोकांना रोखू पाहात होतो पण त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या, त्या रोखणे कठीण झाले होते, जे घडले त्याचे आम्हालाही दुख आहे, अशी वक्तव्ये आजवर अडवाणी गटाकडूनच होत होती. न्यायालयातही तसाच पवित्रा घेतला गेला आहे. असे असताना आता अडवाणी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपले घोडे दामटविण्याचाच प्रयत्न केल्याची चर्चा आहे.
समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी अलीकडेच अडवाणी यांची  स्तुती केली होती. त्याचा उल्लेख करून अडवाणी म्हणाले, योग्य वेळी लोकांना वस्तुस्थिती कळते. त्यामुळे तुम्ही जे आंदोलन हाती घेतले होते त्याचे महत्त्वही कालांतराने लोकांना कळेल. आज अयोध्येवरून टीका होते तेव्हा तुम्ही अपराध्यासारखे लाजू नका. ती फक्त राजकीय नव्हे तर सांस्कृतिक चळवळही होती, हे लक्षात ठेवा. या आंदोलनाने आमची ताकद वाढल्याचे कोणाचे मत असेल तर त्याला आमची हरकत नाही, असेही ते म्हणाले.