सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल लोकांना कुठलेही गैरसमज असायला नकोत, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी केले.

सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) पाठिंबा मिळवण्यासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेले राजनाथ यांनी न्या. खेम करण यांच्या निवासस्थानी भेट दिली.

‘लोकांना सीएएबाबत कुठलेही गैरसमज असायला नकोत असा संदेश त्यांना देण्याचे आमच्या पक्षाने ठरवले आहे. भारतीय संस्कृती आम्हाला ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवते आणि एक हिंदुस्तानी नागरिक जात व धर्माच्या आधारे भेदभाव करू शकत नाही,’’ असे राजनाथ सिंह म्हणाले.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरुद्ध व्यापक निदर्शने होऊन त्यात १९ जण ठार झाल्याच्या काही दिवसांनंतर राजनाथ यांनी लखनऊला भेट दिली आहे.

‘वसुधैव कुटुंबकम’ हा संदेश भारताकडून संपूर्ण जगाला गेला आहे आणि आमचा पक्ष भारताच्या सांस्कृतिक मूल्यांचे उल्लंघन करणार नाही, असे सिंह यांनी सांगितले. त्यांनी सीएएबाबतची माहितीपत्रके वितरित केली आणि प्रसारमाध्यमे व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ती नीट वाचावी असे सांगितले.

पत्रकारांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत विचारले असता, आसाममध्ये ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सुरू आहे आणि केंद्र सरकारने ती स्वत:हून सुरू केलेली नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.