काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणा देताना मुर्दाबाद शब्द वापरु नका अशी सूचना केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्याला प्रेम आणि स्नेहभावाने भाजपाविरोधात विजय मिळवायचा असल्याचं पक्ष कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. काँग्रेस प्रेम आणि स्नेहभावासाठी ओळखली जाते असं पुढे त्यांनी म्हटलं.

बुधवारी ओडिशामध्ये एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख करताच उपस्थितांमधील काहीजणांनी नरेंद्र मोदी मुर्दाबाद घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी राहुल गांधींनी सांगितलं की, ‘मुर्दाबाद हा शब्द आरएसएस आणि भाजपाच्या लोकांकडून वापरला जातो. आपण काँग्रेस पक्ष हा शब्द वापरत नाही. आपला प्रेम आणि स्नेहभावावर विश्वास आहे’.

राहुल गांधी यांनी द्वेष व्यक्त करणारा एकही शब्द न वापरता काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला. ‘नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले आहेत. सर्व बाजूंनी त्यांनी घेरण्यात आलं आहे’, असं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.

‘मोदी जिथे पाहतात तिथे राफेल, शेतकरी, कामगार आणि महिला दिसतात. नरेंद्र मोदी सगळ्या बाजूने घेरले गेले आहेत. यामुळे त्यांचा चेहरा, स्वभाव आणि हावभाव बदलले आहेत. आपण कोणताही द्वेष न दाखवता हे करुन दाखवलं आहे. आपण प्रेमाने त्यांना प्रश्न विचारले. प्रेमाने आपण हे करुन दाखवलं. आपण त्यांचा पराभव करु’, असं राहुल गांधींनी सांगितलं. याच प्रेमाच्या आधारे काँग्रेस ओडिशामध्ये बिजू जनता दलाचाही पराभव करेल असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला.