गुजरात विधानसभा निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता. यावरुन आता पाकिस्तानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘भारताने त्यांच्या निवडणुकीच्या राजकारणात आम्हाला आणू नये. भारताने हे सर्व बंद करुन स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढवावी,’ असे पाकिस्तानने म्हटले आहे. भारताकडून होत असलेले आरोप बेजबाबदार आणि निराधार असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.

गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप असल्याचा आरोप मोदींनी सभेला संबोधित करताना केला होता. यानंतर मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, पाकिस्तानवर कोणाचे प्रेम आहे, ते सगळ्यांना माहित आहे, असे काँग्रेसने म्हटले होते. काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरु असलेल्या या वाकयुद्धावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी ट्विट करुन भाष्य केले. ‘आपल्या निवडणुकीच्या राजकारणात पाकिस्तानला आणणे भारताने थांबवायला हवे. कटकारस्थानांच्या आरोपांऐवजी स्वत:च्या ताकदीवर निवडणूक जिंकायला हवी. अशाप्रकारचे आरोप बिनबुडाचे आणि बेजबाबदार आहेत.’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले.

रविवारी पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये सभेला संबोधित करताना, काँग्रेस पाकिस्तानसोबत निवडणूक लढवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. ‘काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि उच्चायुक्तांची बैठक झाली होती,’ असे मोदींनी म्हटले होते. काँग्रेसने या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे म्हणत सर्व आरोप फेटाळले होते. मात्र माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी अशी बैठक झाली होती, असे म्हणत पंतप्रधानांच्या आरोपाला दुजोरा दिला. ‘इंडियन एक्स्प्रेस’सोबत बोलताना कपूर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे काँग्रेसची गोची झाली आहे.

‘मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या बैठकीत केवळ भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा झाली. या बैठकीत इतर कोणताही मुद्दा चर्चिला गेला नव्हता,’ असे कपूर यांनी सांगितले. माजी लष्करप्रमुखांनी दिलेल्या या माहितीमुळे अय्यर यांच्या निवासस्थानी बैठक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी भारत दौऱ्यावर आले असताना अय्यर यांनी त्यांच्यासाठी ‘डिनर मिटींग’चे आयोजन केले होते. या बैठकीला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह, माजी उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांच्यासह सलमान हैदर, टीसीए राघवन उपस्थित होते.