पंतप्रधान मोदी यांचे बिहारमधील प्रचारसभांमध्ये आवाहन
जद(यू), राजद व काँग्रेसची महाआघाडी सत्तेवर आली, तर लालूप्रसाद यादव यांचा ‘रिमोट कंट्रोल’ बिहारवर चालेल आणि ‘अपहरणाचा’ एकमेव व्यवसाय राज्यात भरभराटीला येईल, अशी टीका करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारमधील प्रचारसभांमध्ये ‘जंगल राज’चा मुद्दा पुन्हा जोरकसपणे मांडला. त्यांचे जंगलराज की आमचे विकासराज याची निवड करा, असेही मोदी म्हणाले.
बिहारमध्ये १२ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या तोंडावर सासाराम व औरंगाबाद येथे घेतलेल्या प्रचारसभांमध्ये मोदी यांनी नितीश कुमार, लालूप्रसाद व सोनिया गांधी यांनी गेल्या ६० वर्षांच्या त्यांच्या सत्ताकाळातील कामगिरीचा लेखाजोखा न दिल्याबद्दल त्यांच्यावर हल्ला चढवला. चारा घोटाळ्यात अडकल्याने लालूप्रसाद स्वत: निवडणूक लढवू शकत नसल्यामुळे ते आता ‘रिमोट कंट्रोल’ने बिहार चालवू इच्छितात, असे मोदी सासारामच्या सभेत म्हणाले. आम्ही ज्या वेळी ‘जंगल राज’बद्दल बोलतो, तेव्हा लालूप्रसाद नव्हे, तर नितीशकुमार अस्वस्थ होतात. खरे तर त्यांनीच लालूंच्या कार्यकाळाचे वर्णन ‘जंगल राज’ असे केले होते, असेही मोदी म्हणाले.
महादलितांचे नेते जितनराम मांझी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवून नितीश यांनी दलितांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप पंतप्रधानांनी दलित नेते दिवंगत जगजीवनराम यांच्या सासाराम मतदारसंघातील भाषणात केला. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेले हिंदुस्तान अवाम मोर्चाचे नेते मांझी हेही या वेळी व्यासपीठावर होते.