News Flash

संघर्ष करा, पण अहिंसक मार्गाने

राष्ट्रपतींचे आवाहन; ‘महात्मा गांधींच्या तत्त्वाचा विसर नको’

(संग्रहित छायाचित्र)

कुठल्याही प्रश्नावर लढताना सर्वानी विशेष करून युवकांनी अहिंसक मार्गाचाच अवलंब करावा, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलनामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या अनुषंगाने कोविंद यांनी हिंसक मार्गाचा त्याग करण्याचे आवाहन केले.

सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टे साध्य करताना घटनात्मक मूल्यांना बांधील असले पाहिजे असेही राष्ट्रपती म्हणाले. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्त्वाची जाणीव करून देताना राष्ट्रपती म्हणाले, ‘‘गांधीजींनी कुठलीही कृती योग्य की अयोग्य यासाठी घालून दिलेला अहिंसेचा निकष आपल्या लोकशाही राज्यपद्धतीच्या कार्यालाही तितकाच लागू आहे.’’

आधुनिक भारतात कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि विधि मंडळ या तीन शाखा महत्त्वाच्या असून त्या एकमेकांशी निगडित आहेत. लोक हा देशाचा महत्त्वाचा घटक आहे. आपण लोकच प्रजासत्ताकाचे खरे भाग्यविधाते आहोत. आपल्याच हाती देशाचे भवितव्य आहे. सरकार आणि विरोधक यांनीही यात महत्त्वाची भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे. या दोन्ही घटकांनी त्यांच्या राजकीय संकल्पनांना मूर्त स्वरूप देताना देशाचा विकास आणि लोककल्याणाशी बांधील असले पाहिजे, असेही राष्ट्रपती कोविंद म्हणाले. राष्ट्रउभारणीत गांधीजींचे आदर्श पाळणे गरजेचे आहे असे सांगून ते म्हणाले, की सत्य आणि अहिंसेच्या गांधीजींनी घालून दिलेल्या मूल्यांच्या आधारे आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे.

२६ जानेवारी हा दिवस महत्त्वाचा आहे, १५ ऑगस्टला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीसुद्धा हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन म्हणून १९३० ते १९४७ या काळात साजरा केला जात होता असे राष्ट्रपतींनी स्पष्ट केले. राज्यघटनेने सर्व नागरिकांना स्वतंत्र लोकशाही देशात काही हक्कदिले असले तरी त्याबरोबर आपल्यावर काही जबाबदाऱ्याही आहेत हे विसरता कामा नये. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा विसर पडू देता कामा नये असे सांगून ते म्हणाले, की घटनात्मक आदर्श अनुसरणे आपल्यासाठी सोपे आहे. जर आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन आणि मूल्ये डोळ्यासमोर ठेवली, तर त्यात अवघड काही नाही. तसे केले तर गांधीजींची शतकोत्तर सुवर्ण जयंती आपण साजरी करण्यास खरा अर्थ प्राप्त होईल.

२१ व्या शतकातील तिसरे दशक हे नवभारताचे आणि भारतातील नव्या पिढीचे असेल. या शतकात जे लोक जन्माला आले ते देशकार्यात सहभागी होत आहेत. कालपरत्वे आपण स्वातंत्र्य लढय़ापासून तुटत चाललो असलो, तरी ज्या मूल्यांच्या आधारे हा स्वातंत्र्य लढा उभारला गेला ती तत्त्वे आजही सर्वाच्या स्मरणात आहेत. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज तरुणांकडे अधिक माहिती आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. पुढील पिढी ही देशाच्या मूलभूत मूल्यांशी वचनबद्ध आहेत. युवकांसाठी देश प्रथम आहे. आपण नवभारताच्या उत्थानाचे साक्षीदार आहोत, असे राष्ट्रपती म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की, आपण जर लोकशाही खऱ्या अर्थाने राबवणार असू तर सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी घटनात्मक पद्धतींशी बांधील असले पाहिजे. डॉ. आंबेडकरांचे हे वक्तव्य आपल्याला कायम मार्ग दाखवत राहील, असे राष्ट्रपती म्हणाले.

जलजीवन जनचळवळ होईल!

स्वच्छ भारत अभियानसह सरकारने राबवलेल्या अनेक योजनांचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा ८ कोटी लोकांना लाभ मिळाला, प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेत १४ कोटी शेतक ऱ्यांना वर्षांला सहा हजार रुपये लाभ मिळाला असे त्यांनी सांगितले. ‘जलजीवन मिशन’ ही योजना जनचळवळ बनेल, असा आशावाद व्यक्त करताना राष्ट्रपती म्हणाले, देश प्रथम हे उद्दिष्ट ठेवून सरकार योजना राबवत आहे. जम्मू काश्मीर, लडाख, ईशान्य भारत, हिंदी महासागरातील बेटे यासह संपूर्ण देशविकासास सरकार बांधील आहे.

कुणालाही शिक्षण नाकारणार नाही!

प्राचीन काळातील शिक्षणपद्धतीत नालंदा, तक्षशीला विद्यापीठांचे स्थान मोठे होते. भारतात ज्ञान हीच शक्ती मानली जात होती. आपल्या परंपरेत शिक्षण संस्थांना आजही मंदिराचे स्थान आहे. स्वातंत्र्यानंतर फारशी साधने नसताना अनेक शिक्षण संस्था सुरू झाल्या, त्या जोरावर शिक्षण क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली. कुठल्याही मुलाला शिक्षण नाकारले जाणार नाही, असा आपला प्रयत्न आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात सुधारणांची गरज असून जागतिक दर्जाचे शिक्षण आपल्याकडे मिळेल यावर भर दिला पाहिजे अशी अपेक्षा राष्ट्रपतींनी व्यक्त केली.

इस्रो, सुरक्षा दलांचे कौतुक

राष्ट्रपती कोविंद यांनी देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचे कौतुक केले. ते म्हणाले आपले लष्कर, निमलष्करी दले, अंतर्गत सुरक्षा दले यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांच्या त्यागातूनच आज देशाची एकता आणि अखंडता टिकून आहे. भारत आणि भारतीय लोक आगेकूच करीत आहेत. ते जागतिक समुदायाला सोबत घेऊन मानवतेसाठी, सुरक्षित भवितव्यासाठी वचनबद्ध आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रोच्या) कामगिरीचा गौरव करताना ते म्हणाले, की गगनयान मोहिमेच्या निमित्ताने ही संस्था एक पाऊल पुढे टाकत आहे. या मानवी अवकाश मोहिमेची देश उत्कंठतेने वाट पाहत आहे.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले..

* देशाच्या भवितव्यासाठी सरकार आणि विरोधक यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडणे अपेक्षित आहे.

* सरकार आणि विरोधी पक्षांनी देशविकास आणि लोककल्याणाशी बांधील असले पाहिजे.

* राष्ट्रउभारणीत गांधीजींचा आदर्श पाळणे गरजेचे आहे.

* राज्यघटनेने नागरिकांना काही हक्कदिले असले तरी काही जबाबदाऱ्याही आहेत हे विसरू नये.

* न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांचा विसर पडू देता कामा नये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 1:25 am

Web Title: dont forget about mahatma gandhis principle presidents appeal abn 97
Next Stories
1 जेटली, स्वराज, फर्नाडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण
2 मतदार ओळखपत्र असणारे भारताचे नागरिकच!
3 नागरिकत्व कायद्याविरुद्ध राजस्थानचाही ठराव
Just Now!
X