देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी राज्यसभेच्या सभापतीपदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी त्यांनी सभागृहाच्या कामकाजात एक लहानसा बदल सुचवला. यापुढे सभागृहातील कामकाजादरम्यान मंत्र्यांनी आणि सदस्यांनी सभागृहाच्या पटलावर पेपर ठेवताना ब्रिटिशकालीन शब्दांचा वापर करू नये. विशेष करून एखाद्या प्रस्तावासंबंधीची कागदपत्रे टेबलावर मांडताना मी याचना करतो (आय बेग) या शब्दांचा वापर टाळावा. त्याऐवजी मी सभागृहाच्या पटलावर हा दस्तावेज ठेवतो आहे, (I raise to lay on the table) असे म्हणावे. कारण, भारत हा स्वतंत्र देश आहे.

आज सभागृहातील कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर सभापतींच्या टेबलावर कागदपत्रे ठेवण्यासाठी संबंधित खासदारांचे नाव पुकारले जात होते. त्यावेळी खासदार आपल्या वाक्याची सुरूवात ‘आय बेग’ने करत होते. आजच्या वेळापत्रकानुसार माझ्या नावासमोर नोंद करण्यात आलेली कागदपत्रे टेबलावर ठेवण्यासाठी मी याचना करतो, असे प्रत्येक खासदार म्हणत होता. त्यावेळी व्यंकय्या नायडू यांनी ही सूचना केली. मात्र, ही केवळ एक सूचना असून आदेश नसल्याचेही त्यांनी लगेचच स्पष्ट केले. याशिवाय, सभागृहातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव जागेवर बसून वाचतानाची प्रथाही त्यांनी मोडीत काढली. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि भैरोसिंह शेखावत त्यांच्या कार्यकाळात श्रद्धांजली प्रस्ताव आसनावर बसूनच वाचून दाखवायचे.