‘स्कॉर्पिअन’ पाणबुड्यांबद्दलची लीक झालेल्या माहितीमुळे कोणताही धोका निर्माण होणार नसल्याचा विश्वास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शुक्रवारी व्यक्त केला. स्कॉर्पिअन’ पाणबुड्यांची समुद्रामध्ये कोणतीही चाचणी झाली नसल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारी माहिती आज देखील सुरक्षित असल्याचे पर्रिकरांनी स्पष्ट केले. संरक्षणमंत्र्यांनी लीक झालेल्या माहितीचा तपास करण्याचे आदेश नौदलाला दिले आहेत. नौदलाचा तपास योग्य मार्गाने सुरु असून संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर चिंता निर्माण होणार नाही याची योग्य काळजी घेतली जात असल्याचेही ते यावेळी म्हणाले. सध्या देशात उद्भवलेली परिस्थिती खराब असली, तरी  चिंता निर्माण करणारी नक्कीच नाही, असे सरक्षणमंत्र्यांनी सांगितले. माहिती लीक झाल्यानंतर नौदलाने सुरु केलेला तपास योग्य दिशेने सुरु असून लवकरच नौदलाला यामध्ये यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘द ऑस्ट्रेलियन’ वृत्तपत्रांने ‘स्कॉर्पिअन’ पाणबुड्यांची गुपिते  जगासमोर आणली होती. या पाणबुड्यांबद्दलची माहिती असणारी काही कागदपत्रे या वृत्तपत्राने बुधवारी आपल्या वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर देशाच्या नौदलाच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. फ्रान्सच्या डीसीएनएस या कंपनीला पाणबुड्या बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीकडील २२ हजार पानांची गोपनीय माहिती असलेली कागदपत्रे लीक झाली असल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन माध्यमांनी जगासमोर आणले. त्यानंतर फ्रेंच सूत्रांनी दस्ताऐवज लीक नव्हे तर चोरी झाल्याचे देखील म्हटले होते. चोरी झालेली कागदपत्रे ही आताची नसून २०११ सालची असल्याची माहिती फ्रेंच सूत्रांकडून देण्यात आली होती.