काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पलटवार केला आहे. आम्ही कोणाला घाबरत नाही, नरेंद्र मोदी यांनी जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, गेल्या पाच वर्षांमध्ये मोदी सरकारने भारतातील घटनात्मक संस्थांवर हल्ला केला, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ‘संस्थात्मक आदर आणि संस्थात्मक द्वेष – दोन विभिन्न दृष्टीकोन’ या मथळ्याखाली ब्लॉग लिहिला आहे. २०१४ च्या उन्हाळ्यात लोकांनी घराणेशाहीला नाकारून लोकशाहीला निवडलं होतं. माध्यमांपासून संसदेपर्यंत, जवानांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्यापर्यंत, संविधानापासून कोर्टापर्यंत काहीही काँग्रेसच्या राजकारणापासून सुटलेले नाही, या घटनात्मक संस्थांचा अपमान करणे ही काँग्रेसची पद्धत आहे, असे मोदींनी या ब्लॉगमध्ये म्हटले होते.

मोदींच्या या ब्लॉगवर प्रियंका गांधी यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. “जितकी आमच्यावर टीका करणार, तितके आम्ही आणखी भक्कम होऊ. आम्ही कोणालाही घाबरत नाही”, असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेला मूर्ख समजणे बंद करावे, गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने देशाच्या प्रत्येक घटनात्मक संस्थेवर हल्ला केला, असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला.

दरम्यान, प्रियंका गांधी या बुधवारी नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत जाणार आहेत. प्रियंका गांधी या तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर असून सोमवारी त्यांनी प्रयागराज येथून दौऱ्याला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी त्या मिर्झापूर येथे गेल्या होत्या. तर बुधवारी शेवटच्या दिवशी त्या वाराणसीत जाणार आहे. मोदींच्या मतदार संघात प्रियंका गांधी पहिल्यांदाच जात आहेत.