गुंतवणूकदारांना घर देण्यास विलंब करणाऱ्या आम्रपाली समुहाला सुप्रीम कोर्टाने बुधवारी फटकारले. जास्त शहाणपणा दाखवू नका, अन्यथा आधी तुम्हालाच बेघर करु, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
आम्रपाली समुहावर ४० हजार गुंतवणूकदारांना वेळेत घराचा ताबा न दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली असून या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. न्या. अरुण मिश्रा आणि न्या. ललित यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. ‘तुम्ही लोकांना घराचा ताबा देण्यास विलंब केला ही मूळ समस्या आहे. तुमचे सर्व प्रोजेक्ट पूर्ण करण्यास किती पैसे लागतील आणि हे पैसे कुठून आणाल हे तुम्ही सांगा?, असा प्रश्न कोर्टाने विचारला. यावर आम्रपाली समुहाच्या वतीने उत्तर देण्यात आले की, आम्हाला ४ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने आम्रपाली समुहाच्या संचालकांना संपत्तीची यादी कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले. जर तुम्ही यादी दिली नाही तर तुम्हालाच बेघर करु. जसं तुम्ही लोकांना घरासाठी वाट पाहायाला लावत आहात, तसंच तुम्हालाही मग घर शोधत फिरावे लागेल, असे कोर्टाने सांगितले. आम्रपाली समुहाची बाजू मांडणारे वकील गौरव भाटीया यांनी सात मालमत्तांची यादी कोर्टात दिली. त्याची किंमत ४०० कोटींपर्यंत असून या मालमत्ता विकून पैसे उभे करण्यास सुरुवात करता येईल, असे त्यांनी सांगितले. यावर सुप्रीम कोर्टाने आम्रपाली समुहाला झापले. जास्त शहाणपणा दाखखवू नका. १४ ऑगस्टपर्यंत पैसे कसे आणाल, याची ठोस माहिती द्या, असे कोर्टाने सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 9, 2018 5:41 am