हिंदी भाषेच्या सक्तीवरुन पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. केंद्र सरकारने हिंदी भाषेत पाठवलेल्या पत्रावर ओडिशातील खासदाराने प्रत्युत्तर दिले आहे. ‘मला हिंदी समजत नाही’ असे पत्रच या खासदाराने सरकारला पाठवले असून हे पत्र खासदाराने उडिया भाषेत लिहीले आहे.

केंद्र सरकार हिंदी भाषेची सक्ती करत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ओडिशामधील बीजू जनता दलाचे खासदार तथागत सत्पथी यांनीदेखील हा मुद्दा उपस्थित केला. केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सर्व खासदारांना एक पत्रक पाठवले होते. या पत्रात जिल्हापातळीवर आयोजित ‘भारत २०२२’ व्हिजन या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र हे पत्र हिंदी भाषेत पाठवण्यात आले होते.

खासदार तथागत सत्पथी यांनी ट्विटरवर तोमर यांनी पाठवलेले पत्र ट्विट करत सरकारवर टीका केली. ‘केंद्रीय मंत्री हिंदी न बोलणाऱ्या लोकांवरही हिंदी भाषेची सक्ती का करत आहे ?, हे या देशातील अन्य भाषांवर आक्रमण नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तोमर यांच्या पत्रावर सत्पथी यांनी उत्तरही दिले. त्यांनी उडिया भाषेत तोमर यांना पत्र पाठवून ‘तुमचे पत्र हिंदी भाषेत असून मला हिंदी भाषा समजत नाही’ असे प्रत्युत्तर दिले आहे. ‘मला पत्र पाठवायचे असेल तर ते इंग्रजी किंवा उडिया भाषेत पाठवावे’ असे त्यांनी सांगितले.

सत्पथी यांच्या या ट्विटने आता पुन्हा एकदा हिंदी भाषा सक्तीचा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. हिंदी भाषेच्या सक्तीवरुन वाद निर्माण होताच हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा विचार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.