उत्तर प्रदेशात मागील काही दिवसांपासून सुरू असलेलं हत्यांचं सत्र सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत दुहेरी हत्याकांडांच्या घटनेला २४ तास लोटत नाही, तोच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाजवळ असलेल्या रेल्वे कॉलनीत मायलेकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली आहे. मृत रेल्वे अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलगा असून, या घटनेनं लखनौ हादरलं आहे.

उत्तर प्रदेशात एकापाठोपाठ एक हत्या सुरू आहेत. राज्यात वाराणसीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडांची चर्चा सुरू असतानाच आणखी एक दुहेरी हत्याकांड घडलं आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये ही घटना घडली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे कॉलनीत ही घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे.

लखनौतील गौतम पल्ली येथील रेल्वे कॉलनीत दोघांची हत्या करण्यात आली आहे. रेल्वेमध्ये उच्च पदावर अधिकारी असलेल्या आर.डी. वाजपेयी यांची पत्नी आणि मुलांची आरोपींनी घरातच गोळ्या घालून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मायलेकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर पोलीस महासंचालक एच. सी. अवस्थी यांनीही घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या परिसरातच हे हत्याकांड घडलं आहे. वाजपेयी यांच्या घरातच आरोपींनी दोघांना गोळ्या घातला. वाजपेयी यांची पत्नी व मुलाचा मृतदेह घरातील बेडवर आढळून आला. त्यांची मुलगी ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार घेत असून, पोलिसांनी सर्व अंगाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं आहे.

पोलीस आयुक्त सुजित पांडे घटनेविषयी बोलताना म्हणाले, “रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात ही घटना घडली आहे. अधिकाऱ्याच्या पत्नीसह मुलाचा मृतदेह बेडवर मिळाले आहेत. कुणीतरी गोळ्या घालून त्यांची हत्या केली असून, अधिकाऱ्याची मुलगी ट्रामामध्ये दाखल आहे. सध्या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे,” असं पांडे यांनी सांगितलं.