काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. यावरुन आता बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी देखील काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसला शिवसेनेने कडक शब्दांत सुनावलेले असतानाही काँग्रेस अद्याप सत्तेत कशी? असा सवाल त्यांनी केला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना मायावती म्हणाल्या, “काँग्रेसची ही दुटप्पी भुमिका आहे. शिवसेना आपल्या मूळ अजेंड्यावर अद्यापही कायम आहे. त्यामुळेच त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर संसदेत केंद्र सरकारला साथ दिली. तसेच सावरकर प्रकरणावरुन शिवसेनेने काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.”

“मात्र, असे असतानाही महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेसोबत सरकारमध्ये कायम आहे. काँग्रेसची ही दुट्टपणी भुमिका नाहीतर काय आहे? शेवटी काँग्रेस या प्रकरणात आपली भुमिका स्पष्ट का करीत नाही. अन्यथा आपल्या पक्षाची कमजोर बाजू लपवण्यासाठी केलेली ही केवळ नाटकबाजीच मानली जाईल, अशा शब्दांत मायावती यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.