महेश सरलष्कर

पश्चिम बंगाल विधानसभेत भाजपच्या जागा वाढतील, पण राज्याची सत्ता बंगाली मतदार भाजपच्या हाती देतील का, याबाबत बंगाली मध्यमवर्ग मात्र साशंक आहे.

‘२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अस्तित्व दाखवून दिले हे खरे असले, तरी अख्खे राज्य ताब्यात घेतील, असे दिसत नाही. तृणमूल काँग्रेसकडे ममता बॅनर्जी आहेत, भाजपकडे नेता कुठे आहे?’, असे मत दक्षिण कोलकातामधील टॉलीगंज परिसरातील मध्यमवर्गीय वस्तीतील कौशिक राय यांचे म्हणणे होते. टॉलीगंज विधानसभा मतदारसंघात भाजपचे बाबूल सुप्रियो यांना विजयाची आशा आहे. दक्षिण कोलकातामधील मध्यमवर्गीय बंगालीबाबूंची मते खेचण्याचा भाजपने आटोकाट प्रयत्न केला आहे. टॉलीगंजमध्ये मतदान झाले असले तरी कोलकाता शहरामधील ११ विधानसभा मतदारसंघात पुढील आठवड्यात मतदान होणार आहे. ‘पश्चिम बंगालमध्ये भाजपची लाट नाही. भाजपला मतदार प्रतिसाद देतील, त्यांच्या जागाही वाढतील. शहरांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणामुळे ममतादीदींवर नाराज असलेला कनिष्ठ मध्यमवर्गीय मतदार भाजपला मत देईल, पण त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला धोका निर्माण होत नाही, असा युक्तिवाद सॉल्टलेक या उच्चभ्रू वस्तीतील एका पुरातत्त्वशास्त्रज्ञाने केला. ‘तृणमूल काँग्रेस हा माफियांनी भरलेला पक्ष आहे. या माफियांविरोधात लोकांची नाराजी आहे, ती कदाचित भाजपच्या मतात रूपांतरित होऊ  शकते. पण भाजपमध्ये सगळे आलबेल नाही. नंदिग्राममध्ये भाजपअंतर्गत प्रचंड संघर्ष होता, सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधातील एक गट ममतांना ‘मदत’ करत होता. नंदीग्राममध्ये अधिकारी पराभूत होऊ  शकतात’, असा दावा सॉल्टलेकमधील या रहिवाशाने केला. भाजपला जास्तीत जास्त ६०-७० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. भाजपचे नेते मात्र २०० जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.

भाजपला सत्ता मिळवायची असेल तर काय करावे लागेल, या प्रश्नावर, ‘साम-दाम-दंड-भेद या सगळ्याचा भाजपला वापर करावा लागेल’, असे एका सरकारी अधिकाऱ्याचे म्हणणे होते. ‘पश्चिम बंगाल भाजपला सहजासहजी हाती लागणार नाही. निधीचा आणि मनुष्यबळाचा किती वापर झाला, त्यावरही भाजपचे यश अवलंबून असेल. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या वेळी हिंसाचाराच्या घटना झाल्या आहेत. त्यामुळे निमलष्करी दलाचे जवान तैनात करावे लागतात. ते एका टप्प्यातील मतदारसंघातून दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात जातात, तशाच गुंडांच्या टोळ्यांही फिरतात. या टोळ्या कुणासाठी कधी काम करतात, हे आपल्यासारख्या सामान्य मतदाराला समजत नाही. ज्या पक्षाकडून अधिक पैसा मिळेल त्यासाठी या टोळ्या काम करतील. यावेळी ममता बॅनर्जींना या टोळ्यांची भीती वाटू लागली आहे, असे या सरकारी अधिकाऱ्याचे म्हणणे होते.

हिंदू-मुस्लीम धु्रवीकरणाचा प्रयत्न यशस्वी?

भाजपचा हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरणाचा प्रयत्ना किती यशस्वी होईल, या प्रश्नावर विधाननगर विधानसभा मतदारसंघातील  ऱ्हित्विक गंगोपाध्याय म्हणाले की, शहरी-निमशहरी भागात काही प्रमाणात भाजपला ध्रुवीकरणाचा फायदा होऊ  शकेल. झारखंडच्या शेजारील पुरुलिया जिल्ह््यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे प्रभुत्व दिसते. पुरुलियामध्ये झारखंडमधून झुंडीने लोक आणून रामनवमी साजरी केली गेली. या प्रकाराबद्दल स्थानिक बंगालींमध्ये नाराजी होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला, तृणमूल काँग्रेस विरोधातील नाराजी अशा अनेक कारणांमुळे डाव्या पक्षांच्या पारंपरिक बंगाली मतदारांनी भाजपला मते दिली होती, पण विधानसभेसाठी ते भाजपला पसंत करतील असे नाही. विधानसभेत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात.

भाजपसमोर मोठे आव्हान

भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता कमी असल्याचा दावा टॉलीगंजमधील कौशिक राय यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी भाजपविरोधात एकट्या लढत असून महिलांना दीदींबद्दल सहानुभूती असल्याने महिलांची मते मिळतील. ममतांच्या सहकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, ममतांवर नाही. त्याचाही सकारात्मक परिणाम होईल. सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बंगालमधील बुद्धिजीवी ममतांच्या पाठीशी आहे. कधीकाळी हा वर्ग डाव्यांच्या मागे होता. त्यांनी डाव्यांच्या विरोधात उघडपणे ममतांची बाजू घेतली. हे मोठे पाठबळ ममता बॅनर्जींकडे अजनूही आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला पराभूत करणे भाजपसमोरील खूप मोठे आव्हान आहे