५ ऑगस्टपासून निर्बंध लागू करण्यात आलेल्या जम्मू व काश्मीरमधील सध्याच्या सुरक्षाविषयक स्थितीबाबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांना माहिती दिली.

सुमारे १० दिवस काश्मीरमध्ये राहून स्वत: तेथील परिस्थितीवर देखरेख ठेवल्यानंतर परतलेल्या डोभाल यांनी घेतलेली शहा यांची ही पहिलीच भेट होती. त्यांनी राज्यातील एकूण परिस्थितीबाबत गृहमंत्र्यांना माहिती दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्रीय गृहसचिव राजीव गऊबा व इतर उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित असलेल्या या बैठकीत राज्यात कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. जम्मू व काश्मीरच्या निरनिराळ्या भागांत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवरही यावेळी चर्चा झाली, असे हा अधिकारी म्हणाला.

अनुच्छेद ३७० मधील तरतुदी रद्द करून राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर ५ ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधील संचार माध्यमांवर तसेच लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले होते. आता हे निर्बंध हळूहळू मागे घेण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना तीन वर्षे मुदतवाढ

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमर जावेद बाजवा यांना तीन वर्षे मुदतवाढ देण्यात आली असल्याचे वृत्त येथील माध्यमांनी दिले आहे. विद्यमान मुदत पूर्ण झाल्यापासून पुढील तीन वर्षांसाठी त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे, असे पंतप्रधानांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. प्रादेशिक सुरक्षेचे वातावरण विचारात घेऊन बाजवा यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हा निर्णय घेतल्याचेही वृत्तामध्ये म्हटले आहे.

काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे पूर्णपणे उल्लंघन -ममता

कोलकाता : जम्मू काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे पूर्णपणे उल्लंघन करण्यात आले असून तेथील लोकांनी आता खोऱ्यात शांतता नांदण्यासाठी प्रार्थना करावी, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

बॅनर्जी यांनी जागतिक मानवता दिनानिमित्त सांगितले, की ‘‘आज मानवता दिन असून काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे पूर्णपणे उल्लंघन सुरू आहे. काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे पालन व्हावे व शांतता नांदावी यासाठी आपण प्रार्थना करू या.१९९५ मध्ये कोठडीतील मृत्यू प्रकरणी मी २१ दिवस रस्त्यावर उतरून मानवी हक्कांसाठी आंदोलन केले होते.’’

‘अफगाण शांतता प्रक्रियेशी काश्मीरचा संबंध जोडणे बेजबाबदारपणाचे’

वॉशिंग्टन, काबूल : पाकिस्तानने अफगाणिस्तानातील शांतता प्रक्रियेशी काश्मीर प्रश्नाचा बादरायण संबंध जोडण्याचा केलेला प्रयत्न बेजबाबदारपणाचा आहे, असे अफगाणिस्तानने स्पष्ट केले असून अफगाणिस्तानात हिंसाचार प्रदीर्घ काळ सुरूच रहावा असा पाकिस्तानचा कुटिल हेतू आहे, अशी टीकाही केली आहे. पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत असाद माजीद खान यांनी ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’ला सांगितले होते, की अफगाणिस्तान सीमेवरचे सैन्य काढून घेऊन ते काश्मीरलगत तैनात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अफगाणिस्तान सीमेवरचे सैन्य काढून घेतल्याने अमेरिका व तालिबान यांच्यातील शांतता चर्चेला फटका बसू शकतो, असे ‘ दी न्यूयॉर्क टाइम्स’ने यासंदर्भात स्पष्ट केले आहे.