भारतात हुंडा बंदीसंदर्भात मोहीम सुरु आहे. हुंडाबळी जाऊ नयेत यासाठी जनजागृती केली जाते आहे. अशात हुंडा किती मिळाला पाहिजे हे सांगणारी एक वेबसाईट प्रकाशात आली आहे. www.dowrycalculator.com या वेबसाईटवर विवाह इच्छुक मुलाची आणि त्याच्या वडिलांची माहिती विचारली जाते आणि त्यानुसार किती हुंडा मागावा हे सांगितले जाते. ही वेबसाईट गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे मात्र सध्या ती प्रकाशात आली आहे. ही वेबसाईट म्हणजे एक लाजीरवाणी बाब आहे असे काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे. तसेच या वेबसाईटवर बंदी घालण्याचीही मागणी त्यांनी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
तनुल ठाकूर हा २९ वर्षीय डेव्हलपर या वेबसाईटचा निर्माता आहे. त्याला ही साईट बंद करण्याबाबत केंद्रीय मंत्रालयाने फोन केले. मात्र ही साईट बंद करणार नाही अशी मुजोर भूमिका तनुल ठाकूरने घेतली आहे. हा सगळा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असल्याचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटले आहे. त्या आशयाचे एक ट्विटच त्यांनी केले आहे.
हुंडाबळी प्रतिबंधक कायद्या अन्वये या वेबसाईटवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडेही करण्यात आली आहे. तर मी तयार केलेली साईट हुंडा घेण्यास प्रोत्साहन देणारी कशी काय वाटू शकते? मला याबाबत आश्चर्य वाटते आहे असे तनुल ठाकूरने म्हटले आहे. या वेबसाईटला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये नवऱ्या मुलाचे वय, त्याची नोकरी, जात, कमाई अशा बाबी भरायच्या आहेत. त्यानंतर त्याचे वडिल काय करतात हे देखील स्पष्ट करायचे आहे. ही सगळी माहिती भरल्यावर या मुलाने किती हुंडा मागावा याचा अंदाज या वेबसाईटवर देण्यात येतो. याआधीही माझ्या वेबसाईटवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी काही प्रसारमाध्यमांनी केली आहे. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आता अचनाक माझी वेबसाईट पुन्हा चर्चेत कशी आली ते समजत नाही असेही ठाकूर याने म्हटले आहे. या वेबसाईटच्या सुरुवातीलाच मी ही वेबसाईट लग्न जमवणाऱ्या काकू आणि मावशी यांना समर्पित असे स्पष्ट केले आहे. ही वेबसाईट फक्त मजा म्हणून तयार करण्यात आली आहे त्यात हुंड्याला प्रोत्साहन देण्याचा प्रश्नच नाही असेही ठाकूर याने स्पष्ट केले आहे.
असे असले तरीही सध्या www.dowrycalculator.com ही वेबसाईट चांगलीच चर्चेत आली आहे. या वेबसाईटमुळे हुंडा घेण्यास प्रोत्साहन मिळू शकते अशी भीती काँग्रेसने व्यक्त केली असून त्यासंदर्भात मेनका गांधी आणि रविशंकर प्रसाद या दोन्ही नेत्यांना पत्र लिहिले आहे. आता यापुढे या वेबसाईटचे काय होणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 2, 2018 3:11 pm